

नरवणला सुमारे 500 वर्षांपुर्वीचे श्री व्याघ्रांबरीचे मंदिर आहे. या मंदिराबद्दल एक आख्यायिका आहे. एक मुस्लीम व्यापारी घरबांधणीच्या साहित्याने भरलेली सहा जहाजे घेऊन गोव्याकडून कोकणाकडे येत असताना नरवण गावाच्या जवळपास आल्यानंतर अचानकपणे वादळाला सुरुवात झाली. त्यावेळी या मुस्लीम व्यापाऱ्याने या परिसरातील ग्रामदेवतेची करूणा भाकून माझी जहाजे वादळातून सुखरुपपणे किनाऱ्याला लागल्यास जहाजातील सामानाने तुझे देऊळ बांधेन अशी प्रार्थना केली. देवीच्या आशिर्वादाने सर्व जहाजे वादळातून सुखरूप किनारी पोहोचली व त्या मुस्लीम व्यापाऱ्याने देवीला शब्द दिल्याप्रमाणे ग्रामदेवता व्याघ्रांबरीचे मंदिर बांधून दिले. या मंदिराचे बांधकाम लाकडाचे असून त्यावर अतिशय सुबक व कलाकुसर आहे. विशेष म्हणजे या लाकूड कामात कुठेहि चुका व खिळ्यांचा वापर करण्यात आलेला नाही. 500 वर्षापूर्वी वापरलेले लाकूड आजही तेवढ्याच मजबुतीने अस्तित्वात आहे. त्याला कोणतीही बाधा (वाळवी, भुंगा आदी) पोचलेली नाही. मंदिरातील मुर्त्या या पाषाणरुपातील असून पारंपरिक रितीरीवाजाप्रमाणे त्यावरती चांदीचे मुखवटे सजविले जातात. मंदिराच्या उजव्या बाजुला म्हारजाईचे तर डाव्या बाजुला आदेश्र्वराचे मंदिर आहे.


या ग्रामदेवतेचा देवदिवाळीतील बगाडा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. कार्तिक दर्श अमावस्येला (देवदिवाली) याठिकाणी मोठी जत्रा भरते. सुमारे 25 फूट उंचीवर ठेवलेल्या 40 फूट लांबीच्या लाकडी लाटेला एका बाजुला दोरी असते. तर दुसऱ्या बाजुला लोखंडी आकडे असतात. हे आकडे मानाच्या व नवस फेडणाऱ्या भाविकाच्या पाठीवर टोवले जातात. त्यानंतर दोराने लाट खेचून त्या भाविकाला जमीनीपासून 25 फूट उंचीवर नेवून अधांतरी फिरवले जाते. यावेळी नवस फेडणाऱ्या भाविकाच्या एका हातात घंटा व दुसऱ्या हातात तांदूळ असतात. तर मुखात आकडे टुपले, नवस पावले असा जयघोष सुरु असतो. यालाच परंपरेने बगाडा असे म्हणतात. मानवी शरीराला सुई टोचली तरी भळाभळा रक्त येते येथे मात्र पाठीत लोखंडी आकडे टुपवून 25 फूट उंचीवर अधांतरी फिरवले जाते. तरीही रक्त वाहणे, जखम होणे असे घडत नाही. आजपर्यंत कोणाला दुखापत झाल्याचेही ऐकिवात नाही. या बगाड्याची सुरुवात केव्हापासून झाली हे आजच्या पिढीला सांगता येत नाही. या देवीच्या साक्षात्काराला आव्हान देण्यासाठी ब्रिटीश काळापासून आतापर्यंत स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे अनेकजण पुढे आले. मात्र, देवीच्या श्रध्देचा साक्षात्कार झाल्यावर ते सुध्दा देवीचे भक्त झाले. देवीकडे बोललेले व पूर्णत्वास गेलेले नवस फेडण्यासाठी आकडे टुपवून घेताना त्या दिवशी सुर्योदयापासून आकडे टुपवून घेईपर्यंत तोंडातील थुंकीही पोटात न घेता भक्तगण उपवास करतात.


या व्याघ्रांबरीचे दिवाडकर, निमकर, ओक, दिवाडकर असे चार प्रमुख मानकरी आहेत. कानडे, लेले, जोशी, राऊत, जाधव, खेडेकर, वैद्य व वेल्हाळ ही मंडळी देवीची पालखी सजविणे, मुखवटे सजविणे, ते पाषाणावर ठेवणे, देवीला दागिने घालणे, निशाण लावणे, महावस्त्र तयार करणे अशी पिढ्यानपिढ्या नेमून दिलेली कामे श्रध्देने व भक्तीभावाने करतात. उभ्या असलेल्या प्रमुख लाकडी खांबावर 25 फूट उंचीवर 40 फूट लांबीची लाट चढविणे, नवसकरी आणि मानकरी यांच्या पाठीवर आकडे टुपविणे हा मान जाधव मंडळींचा आहे. उभ्या खांबाला आधार देण्यासाठी लागणारे आंब्याचे लाकूड मुसलोंडी गावातील बारगोडे मंडळींकडून दिले जाते. तर लाट फिरविण्यासाठी लागणारा दोर हा पुर्वीच्याकाळी रोहिले गावातील रोहिलकर ग्रामस्थ आणत असतं. हे रोहिलकर बंधू कालानुरुप विखुरले गेल्याने सध्या हा दोर बोऱ्या कारुळ येथील रोहिलकर कुटुंबाकडून आणला जातो. नरवणच्या बगाडा उत्सवातील पहिला आकडा टुपवून घेण्याचा मान गावातील कुंभार समाजाचा असून प्रतिवर्षी कुंभार समाजातील प्रत्येक कुटुंबाला हा मान क्रमशः दिला जातो. या मानाच्या आकड्यानंतर इतर नवसाचे आकडे टुपविले जातात. ग्रामदेवतेची पुजा ही गावातील गुरव मंडळींकडूनच केली जाते.