उद्यापासून शिमगोत्सवाला सुरुवात
गुहागर : कोकणातील पारंपारिक आणि कोकण वाशियांचा आवडता सण म्हणजे शिमगोत्सव. हा शिमगोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. या शिमगोत्सवात संकासुर अर्थात खेळे हे परंपरेनुसार गावोगावी गावभोवनीसाठी फिरतात. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाकडून नवनवीन अटी व शर्ती घालण्यात आल्यामुळे गुहागर तालुक्यातील नमन मंडळे संभ्रमावस्थेत आहेत.
शिमगोत्सव हा सण कोकण वाशियांसाठी पर्वणीच असते. फाक पंचमीला पहिली होळी झाल्यानंतर दुसर्या दिवशी नमन मंडळे आपापले खेळे घेउन गावभोवनीसाठी बाहेर पडतात. काही खेळे गाव भोवनीसाठी बाहेर पडले की मोठ्या होळीच्या अादल्या दिवशी आपापल्या गावात जातात. परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने नियमावलीची भलीमोठी यादी जाहिर केली आहे. त्यामुळे शिमगोत्सवात गावभोवनीला बाहेर पडावे की नाही या संभ्रमात नमन मंडळे आहेत.
शासनाच्या नियमावलीनुसार २५ लोकांसमवेत सण साजरे करावेत असं म्हटले जात आहे. परंतु, नमन मंडळांनी प्रशासनाकडे विचारणा केली असता प्रशासन कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे काय निर्णय घ्यावा, या संभ्रमात नमन मंडळे आहेत.