पंतप्रधानांसोबतच्या संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्र्वास
(मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कक्षाच्या सौजन्याने)
मुंबई : माझे कुटुंब , माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत आहोत. भविष्यात महाराष्ट्रातील मृत्यू दर आणि कोविड संसर्गाचा दर कमी झालेला आपल्याला दिसेल. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान मोदींबरोबर झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब , तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. प्रत्येक राज्यातील कोविड परिस्थिती आणि राज्यांच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मार्च २०२० मध्ये ७७२२ बेडस, आयसीयु बेडस ३०९१ आणि ११४३ व्हेंटीलेटर्स होते. क्वारंटाईनसाठी ३५३ संस्थामध्ये १६,१९२ खाटांची सोय होती. आज एकूण उपलब्ध बेडची संख्या ३ लाख ६० हजार एवढी आहे. १०१० संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये १,२४,२८४ खाटा उपलब्ध आहेत. ऑगस्ट महिन्यात दर दिवशी ६५ हजार चाचण्या होत असत. सध्या राज्याची चाचणी क्षमता दर दिवशी ८० हजार चाचण्या इतकी आहे. हा दर प्रति दिन दिड लाख चाचण्यांवर नेण्याचे लक्ष्य आहे. गेल्या महिन्यात राज्यात १८ RTPCR चाचणी प्रयोगशाळा सुरु झाल्या. RTPCR चाचणी कीट अतिशय स्पर्धात्मक किंमतीत खरेदीस सुरुवात केली आहे. खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स राखीव ठेवणे बंधनकारक केले असून राज्यातील सर्वच नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जात आहे.
ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे. ऑक्सिजन उपलब्धतेसाठी व येणाऱ्या अडचणींसाठी नियंत्रण कक्ष तयार केला असून ऑक्सिजनचे उत्पादनही आम्ही नियंत्रित केले आहेत. एकूण ऑक्सिजन उत्पादनाच्या ८० टक्के पुरवठा आता मेडिकलसाठी व २० टक्के पुरवठा उद्योगांसाठी करणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान राज्यात प्रभावीपणे राबविले जात आहे. राज्यात ५५ हजार आरोग्य पथके तयार करण्याचे निश्चित केले होते. मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे ५९ हजार आरोग्य पथके कार्यरत झाली आहेत. मोहीम सुरु झाल्यापासून राज्यात ७० लाख ७५ हजार ७८२ घरांना (२६% घरे) आरोग्य पथकांनी भेटी देऊन २.८३ लाख ( १८ %) लोकांचे आरोग्य सर्व्हेक्षण झाले. त्यामध्ये ४८२४ कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती तसेच ७ लाख ५४ हजार कोमॉर्बिड लोक आढळले.
राज्यात प्रायोगिक तत्वावर टेलीआयसीयू व्यवस्था सुरु केली आहे. राज्यात सर्वत्र ही व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत. कोविडनंतर देखील रुग्णांना वैद्यकीय उपचारांची गरज असून त्या दृष्टीने पोस्ट कोविड उपचार केंद्रे सुरु करणार आहोत.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही सूचना मांडल्या. लस उत्पादन लवकरात लवकर होण्यासाठी ट्रायलची प्रक्रिया लवकर व्हावी. तसेच या लसीच्या वितरणाचे योग्य नियोजन आवश्यक आहे. राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता असून केंद्राने वैद्यकीय ऑक्सिजनच्या किंमतीचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे तसेच वितरणाच्या बाबतीत देखील नियंत्रण असणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी आपल्या स्तरावरून परत एकदा देशातील नागरिकाना संबोधन करून कोरोनाचा लढा आपल्याला पुढील काळात कसा लढायचा आहे. याविषयी मार्गदर्शन करावे.
महाराष्ट्र के लोग बहादूर- पंतप्रधान
महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है असे सांगून कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल. अशी सुचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.