गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर – वाडदई ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वाडदई गावात मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने आरोग्य तपासणी सर्वेक्षण अंतर्गत वेळणेश्वर गावात माझं कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सौ.ठाकूर यांनी कोरोना प्रादुर्भावानंतर जिल्ह्यात सर्वप्रथम आपल्या जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिकांची आरोग्य पथकाच्या माध्यमातून तपासणी व औषधे वितरित केली होती. त्यांच्या या उपक्रमामुळे या गटात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य पथक दोन वेळा गावातील ग्रामस्थांच्या घरी दोनवेळा भेटी देऊन आरोग्य शिक्षण, आरोग्य संदेश, संशयित कोरोना रुग्ण शोधणे, तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा यासारखे आजार व अती जोखिम व्यक्ती ओळखून उपचारासाठी सहकार्य करणे व औषधे उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येणार आहे. तपासणी करणाऱ्या पथकासह ग्रामस्थांना जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. गावातील एकही ग्रामस्थ या सर्व्हेतून बाजूला राहिला नाही पाहिजे, अशा सूचना केल्या. सदर सर्वेक्षण मोहिमेला नागरिकांनी उस्फुर्तपणे पुढे येऊन सहकार्य करावे व कोरोना पाश्वभूमीवर आपली एक सामाजिक जबाबदारी पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले.
या शुभारंभ कार्यक्रमाला वेळणेश्वर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नवनीत ठाकूर, माजी तंटामुक्त अध्यक्ष विनायक कांबळे, सुभाष कांबळे, वाडी प्रमुख भिकू कांबळे, सुरेश कांबळे, हरिश्चंद्र कांबळे, संदीप भेकरे, विलास कांबळे, रमेश कळंबटे, सुनील जोशी, शांताराम जोशी, संदीप जोशी, रवींद्र जोशी, दत्तराम जोशी, आशा सेविका व आरोग्य सेवक उपस्थित होते.