गुहागर : माझ्यामुळे राज्यातल्या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा समज गैरसमज संदेश जाता कामा नये म्हणुन मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले याना विनंती करणार आहे की त्यांनी हा हक्कभंग तातडीने स्वीकृत करावा. त्यांनी पाठवलेल्या नोटीसीला उत्तर न देता होणाऱ्या कारवाईला मी सामोरा जाईन. अशी भुमिका खासदार सुनिल तटकरे यांनी घेतली आहे.
दापोली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांच्या विरोधात विधानसभेचे सभापती नाना पटोले यांचेकडे 20 ऑक्टोबर रोजी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाबाबत आपली भुमिका स्पष्ट करताना खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. पाच वेळा आमदार होतो. आता संसद सदस्य आहे. अशा वेगवेगळ्या भूमिकेत आपण काम करत असताना माझ्यावर प्रथमच हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. माझ्यामुळे राज्यातल्या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा समज गैरसमज पसरता कामा नये. चुकीचा संदेश जाता कामा नये. म्हणून मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना विनंती करणार आहे की त्यांनी हा हक्कभंग तातडीने स्वीकृत करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमध्ये मला संसद सदस्य म्हणून बैठक बोलावण्याचा अधिकार आहे की नाही ते विधानसभा अध्यक्षांनी तपासून पहावे. तातडीने मला नोटीस काढावी. या नोटीसीला मी उत्तर देणार नाही. जी कारवाई होईल त्याला सामोरा जाईन. कारण मी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षे टिकलेच पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. म्हणूनच हा हक्कभंग प्रस्ताव दाखल करून घेऊन माझ्यावर जी काही कारवाई करायची असेल ती करण्यात यावी. पाच वर्षे महाराष्ट्रात भक्कमपणे सरकार टिकवायचे आहे. त्यामुळे हे महान देशभक्त दुर्देवाने त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत आहेत त्याबद्दल मला काही बोलायचे नाही.
महाविकास आघाडीचे सरकार टिकले पाहिजे ही आमची भूमिका आहे. म्हणूनच काही महीन्यांपूर्वी आपण मंडणगड येथे गेलो असताना तेथील शिवसेनेचे काही स्थानिक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. मी त्याला कडाडून विरोध केला होता. पण नंतरच्या कालावधीत मात्र आमचे दापोली पंचायत समितीचे सभापती राऊफ हजवानी यांच्या पत्नीला शिवसेनेत प्रवेश देत त्यांनी आघाडीच्या धर्माला तिलांजली देण्याचे काम केले. अशी एक आठवणही खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितली.