आमदार भास्कर जाधव, लोकांचे प्रश्र्न सोडविण्याची क्षमता माझ्यात आहे
गुहागर : सी व्ह्यु गॅलरी आणि जेटीमध्ये भास्कर जाधव यांनी कोणाचे काय वाईट केले ते सांगावे. काहीजणांनी आनंद व्यक्त करुन आपली विकृती दाखवून दिली. ही प्रवृत्ती म्हणजे दुसऱ्याचे दात कोरुन स्वत:चे पोट भरण्यासारखे आहे. असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी आमदार जाधव यांनी मोडकाआगर पुल, पेट्रोलपंप, राष्ट्रीय महामार्ग अशा समस्यांमध्ये मी लक्ष घालीन. एखादा विषय हाताळला तर तो सोडवण्याची धमक माझ्यात अजुनही आहे. पण या समस्या सोडवण्याची गरज गुहागरकरांना आहे का. असा खोचक प्रश्र्नही त्यांनी विचारला.
समुद्र दर्शनी आणि जेटी तोडण्याच्या हरित लवादाच्या आदेशांनंतर प्रथमच आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत आपली सडेतोड भूमिका मांडली. विरोधकांवर आक्रमकपणे हल्ला करणे आणि मनातील खदखद, दु:ख मांडणारे आमदार भास्कर जाधव जवळपास दोन वर्षांनी पहायला मिळाले. आमदार जाधव म्हणाले की, सी व्हयु गॅलरी आणि जेटीमध्ये कोणाची जागा गेली, कोणाचा रस्ता गेला, कोणाचे धंदे बुडाले, काय नुकसान झाले ते तरी स्पष्टपणे सांगावे. कशाकरीता हा विरोध चाललाय, विरोध करणाऱ्यांना लोक का पाठीशी घालतात हे कळले नाही.
हरित लवादाने दिलेल्या निर्णयामुळे बांधकाम तोडण्याबरोबरच अधिकाऱ्यांकडून पैशांची वसुल करावी असाही निर्णय झालायं. यावर काही पक्षांचे नेते आनंद व्यक्त करतात. हे पैसे नगरपंचायतीत जमा करुन विकास करा. असे सांगतात. म्हणजे दुसऱ्यांचे दात कोरुन स्वत:चे पोट भरण्याचा उद्योग सुरु आहे. आजपर्यंत आम्ही सांगतलेली कामे अधिकारी करत होते. त्यांना विश्र्वास होता आमदार जाधव त्यांच्यामागे उभे आहेत. आता केवळ गुहागरच नाही तर संपूर्ण किनारपट्टीवर कोणता अधिकारी काम करण्याचे धाडस करेल. काही लोकांनी तर गॅलरी पडल्यानंतर फीदी फीदी हसून फोटो काढले. ही विकृत प्रवृत्ती नाही का. समुद्रकिनाऱ्यावरील सी व्ह्यु गॅलरीवर पर्यटक जात होते. तरुण तरुणी जात होती. लहान मुले जात होती, नवरा बायको जात होती. समुद्राचा, सुर्यास्ताचा आनंद घेत होती. तेव्हा यांनी आनंद व्यक्त केला नाही. पण एखाद्याचं घर जळताना, शेकोटी पेटली आहे म्हणून उब घेणऱ्याच्या प्रवृत्तीला काय म्हणावे.
गुहागर तालुक्यासाठी बांधलेले क्रीडा संकुलही लवकर तुटावे अशी इच्छा आहे. म्हणजे मी चुकीचे पैसे खर्च केले असे यांना दाखवून देता येईल. याला काय म्हणावे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड व दापोली या दोन शहरात क्रीडा संकुले आहेत. बाकीच्या तालुक्यांची क्रीडा संकुले कुठे आहेत ते या बुध्दीजीवी लोकांनी पाहून यावे. बरं आज ही शहरात क्रीडा संकुलासाठी निधी द्यायला तयार आहे. त्यासाठी गेली 10 वर्ष शहरात जागा मागतोय ती द्यायला कोणी कोणी समोर येत नाही. गेली ५ वर्ष तुमची सत्ता त्यावेळी तुम्ही का जागा दिली नाही.
यापैकी एकाही विषयावर जनता काहीच बोलत नाही. उठाव करत नाही. याचा अर्थ या विचारांना, प्रवृत्तीला येथील लोकांचा पाठिंबा आहे. मग मी लक्ष का घालावे. मी लोकशाही मानतो. लोकांच्या मताचा आदर करतो. लोकशाहीत आपला हेका चालवून चालत नाही. त्यांनी असगोली वेगळी केली. त्या असगोलीला एक रुपया तरी ह्यांनी आणून दिला असेल तर दाखवावा. तरीसुध्दा लोकांचा त्यांनाच पाठींबा आहे. नगरपंचायतीत पाडले. मोडकाआगर पुल, राष्ट्रीय महामार्गाच्या विषयातही आम्ही हे करु, ते करु सांगितले. काय केले ते आपण पहातोय. तरीही जनता काही बोलत नाही. म्हणून मी थांबलोय. मी गेली 36 वर्ष राजकारणात आहे. कधी थांबायचे कधी क्रीयाशील व्हायचे ते मला बरोबर समजते. लोकांचे प्रश्र्न सोडविण्याची क्षमता माझ्यात आहे. फक्त हे लोकांना समजण्याची वाट पहात होतो.
गुहागर शहरातील पेट्रोलपंपाचा विषय आता त्यांना कळेल असेल. पण मंत्री होतो तेव्हा गुहागरात पेट्रोलपंप व्हावा म्हणून प्रस्ताव पाठवलाय. लोकांनी मागणी केली जरुर पाठपुरावा करु. अन्यथा मी पेट्रोलपंप आणायचा आणि ह्यांनी त्याची सी व्ह्यु गॅलरी करायची. असे व्हायला नको. मोडकाआगर पुल आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामात देखील लक्ष घातले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्तिश: फोन करुन सांगितले. तुमच्या शब्दाखातर महामार्ग गुहागरपर्यंत केला पण अजुन मोजणी झालेली नाही. तेव्हा संयुक्त मोजणी सुरु झाली. पण अधिकाऱ्यांनी ठरवलेला मोजणीचा दिवस मला कळला नाही. अन्यथा संयुक्त मोजणीत जे झाले ते टाळले असते. महामार्ग कुठे थांबणार हे मोजणीद्वारे आता निश्चित झाले आहे. यापुढे प्रत्यक्षात कोणाची किती जागा जाते ते समोर येईल. मोडकाआगर पुलाचे काम पाणी कमी झाल्याशिवाय पुढे सरकणार नाही. महामार्गाच्या कामाला सुरवात होईल तेव्हा शृंगारतळी ते मोडकाआगर पुले या कामाला प्राधान्य देण्याची विनंती शहर शिवसेनेने केली आहे. त्याची सूचनाही अधिकाऱ्यांना करणार आहे.