गुहागर : महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहिम गुहागर बरोबरच संपूर्ण जिल्ह्यात २००८ पासून सुरु झाली. श्रमदानावर आधारीत या मोहिमेतून बंधारे बांधून पाणी अडवण्याचा अभिनव उपक्रम पंचायत समिती गुहागर व कृषी विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सहकार्याने गेली ११ वर्षे जोमाने सुरू आहे. यावर्षी मिशन बंधारे मोहीम कोरोना संकटामुळे राबवण्याबाबत प्रश्नचिन्ह आहेत. यामुळे टंचाईग्रस्त गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.
या बंधाऱ्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पाणीटंचाईवर काही प्रमाणात का होईना मात करण्यात प्रशासन व ग्रामस्थ यशस्वी होताना दिसले. दरवर्षी या मोहिमेत गुहागर पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींचा सहभाग उल्लेखनीय असल्याचे चित्र पहावयास मिळते. गुहागर तालुक्याची पावसाची सरासरी गेल्या अनेक वर्षांच्या पावसाची सरासरी पेक्षा या दोन वर्षात पाऊस चांगल्याप्रकारे पडला आहे. कोकणातील जमिनीतील पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे पावसाळ्यानंतर व हिवाळा संपल्यानंतर पाण्याच्या पातळी वेगाने कमी होते. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनावर टँकर सुरू करण्याची पाळी येते.
दरवर्षी ०२ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने तालुक्यातील मिशन बांधले मोहिमेला सुरुवात केली जाते. या मोहिमेत पंचायत समिती व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी बरोबरच लोकप्रतिनिधीही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या मिशन बंधारे मोहिमेचा शुभारंभ लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या उपस्थितीत बंधारा बांधून करण्यात येतो. गुहागर पंचायत समितीची उत्कृष्ट परंपरा गेली अकरा वर्षे सातत्याने सुरू आहे. या मोहिमेत ग्रामसेवक संघटना, सामाजिक संस्था देखील अग्रक्रमाने सहभागी होत असतात. गावोगावी बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन त्या त्या गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष, विविध ग्राम विकास मंडळ यांचा सहभाग असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमदान शिबिरांमधून ही विद्यार्थी विशेष करून वनराई व विजय बंधारे बांधतात. बचत गटांच्या महिला वर्गाचाही सहभाग उल्लेखनीय असतो.
दरम्यान, यावर्षी पाऊस ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धो-धो कोसळला. तसेच मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट राज्यावर व तालुक्यावर असल्याने प्रशासकीय कामकाजही धीम्या गतीने सरकत आहे. त्यातच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग राखावी लागत आहे. याचा परिणाम मिशन बंधारे मोहिमेवर झाला आहे.