भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गुहागर : जयगड मधील नापता असलेल्या बोटीवरील गुहागर तालुक्यातील पाच बेपत्ता असलेल्या खलाशांची व एका खलाशाच्या मृत्युची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच संबंधित खलाशांचा विमा उतरविला नसल्यास बोट मालक आणि मत्स्य विभागाचे संबंधित अधिकारी यांचीसुद्धा चौकशीची मागणी केली आहे.
The BJP district president demanded an in-depth inquiry into the deaths of five missing sailors and one sailor in Guhagar taluka on a measured boat in Jaigad. Vinay Natu has written a letter to Chief Minister Uddhav Thackeray. It has also demanded an inquiry from the boat owners and the concerned officials of the Fisheries Department if the sailors concerned have not been insured.


या पत्रात म्हटले आहे की, 26 ऑक्टोबर 2021 पासुन जयगड बंदरातील नासिर हुसेन मियाँ संसारे यांच्या मालकीची नाविद – 2 ही मच्छीमारी बोट सात खलाशांसहित बेपत्ता आहे. या बोटीवरील सात खलाशांपैकी सहा खलाशी हे गुहागर तालुक्यातील आहेत. त्यापैकी साखरी आगर गावातील अनिल गोविंद आंबेरकर या एकमेव खलाशाचा मृतदेह सापडला आहे. अन्य सहा खलाशी बेपत्ताच आहेत. या मच्छीमारी नौकेला जयगड बंदरांमध्ये येणारी मोठी बोट आपले चॅनल सोडुन धडकली आणि त्यामुळेच नाविद – 2 ही बोट बुडून सहा खलाशी बेपत्ता झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे बंदर विभाग आणि कोस्टगार्ड विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन 20 ऑक्टोबर पासून 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत जयगड बंदरातील जेएसडब्ल्यू पोर्ट, कानोजी आंग्रे पोर्ट व इतर कारणांसाठी येणाऱ्या मोठ्या जहाजांची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याची मागणी डॉ. नातू यांनी केली आहे.
नाविद – 2 या मच्छीमार नौकेच्या नापता होण्याच्या कालावधीत जेएसडब्ल्यूच्या स्पोर्ट परिसरात काही मृतदेह दिसत असल्याची चर्चा मच्छीमारांमध्ये दबक्या आवाजाने होत आहे. पण या मृतदेहांची माहिती ना मच्छिमार बांधवांकडून दिली गेली, ना कोस्टगार्डकडून घेतली गेली, ना जेएसडब्लू पोर्टच्या गस्ती नौकेकडुन घेतली गेली. या तरंगणाऱ्या मृतदेहांची किनारी आणण्याची व्यवस्था झाली असती तर बेपत्ता असलेल्या खलाशांबाबत काही ना काहीतरी माहिती उपलब्ध झाली असती. याकडे सुद्धा डॉ. नातू यांनी लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर मत्स्य विभागाच्यावतीने प्रति वर्षीचे मस्य परवाने देताना मच्छीमार सोसायटीमार्फत संबंधित बोटींचा व बोटीवर काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या खलाशी संख्येचा विमा उतरविला आहे की, नाही हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. प्रतिवर्षी अनेक खलाशांचा वेगवेगळ्या कारणाने बोटीवरती किंवा बोटी वरून पडून मृत्यु झाल्याची नोंद होत आहे. मात्र ही प्रकरणे तात्काळ बंद केली जातात. यामुळे खलाशांची कुटुंब मात्र उघड्यावर येतात. गुहागर तालुक्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात परराज्यातील खलाशी संख्या मोठी आहे. याची सुद्धा कोणत्याही प्रकारची वेगळी नोंदणी करण्यात येत नाही किंवा खलाशांनी प्राण गमावल्यास त्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. याचे गांभीर्य लक्षात घेऊन या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन मृत्यू झालेल्या व बेपत्ता असलेल्या खलाशांच्या कुटुंबांना तातडीने आर्थिक सहकार्य होण्यासाठी व बेजबाबदार घटकांवर योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

