अँटिजेन टेस्टमध्ये 15 पॉझिटिव्ह ; बाजारपेठ बंदचा निर्णय ठरला योग्य
गुहागर : श्रृंगारतळी बाजारपेठेतील व्यापारी आणि त्याच्या दुकानातील कर्मचारी अशा 15 जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि व्यापारी संघटनेने बाजारपेठ बंदचा घेतलेला निर्णय योग्य होता. यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र कोणतीही आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नसताना अँटीजेन टेस्टमध्ये व्यक्ती कोरोनाग्रस्त होत असल्याने लोकांमध्ये प्रचंड संभ्रमही निर्माण झाला आहे.
तालुक्यासह शृंगारतळीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच शासनाने लॉकडाऊनमधील बंधने शिथील करायला सुरुवात केल्याने शृंगारतळी बाजारपेठेतील वर्दळही वाढली आहे. याचाच परिणाम म्हणून गणेशोत्सवानंतर गुहागरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढु लागली. कोरानाचा वाढता प्रादुर्भाव व श्रृंगारतळीतील गर्दी पाहून शृंगारतळी बाजारपेठ बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली. मात्र या मागणीला काही व्यापाऱ्यांनी विरोधही केला. अखेर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराखाली ग्रामस्थ व व्यापाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला तहसीलदार सौ. लता धोत्रे उपस्थित होत्या. या बैठकीत सरपंच संजय पवार यांनी बाजारपेठ बंद मागची भूमिका सांगितली. अखेर विचार विनिमय करुन व्यापारी संघटनेने ११ सप्टेंबर पासून 14 सप्टेंबर पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याच बैठकीत पवार यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले होते की, अँटीजेन टेस्टची सुविधा शृंगारतळीमध्ये सुरु झाली आहे. या संधीचा फायदा घेवून व्यापाऱ्यांनी स्वत:ची व त्यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी अँटीजेन टेस्ट करुन घ्यावी. पवार यांच्या विनंतीला मान देत व्यापाऱ्यांनी ॲटीजेन टेस्टला होकार दिला. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसात शृंगारतळीमधी व्यापाऱ्यांनी तपासणीला सहकार्य केले. या तपासणीत 15 जण कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले आहे. सर्दी, ताप, खोकल्याची कोणतीही लक्षणे दिसत नसताना कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने अनेक जण हैराण झाले आहेत. तर बाजारपेठ बंदचा निर्णय योग्यच होता हे ही सिध्द झाले आहे.
कोरोनाच्या संकटात पहिला रुग्ण शृंगारतळीला सापडला. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच श्रृंगारतळी बाजारपेठ बंद झाली. एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यावर बाजारपेठ चालु करण्याचा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला. परंतू तेव्हाही रुग्णांची संख्या वाढु लागली. त्यामुळे हा निर्णय त्यांनी मागे घेतला होता. जुलै महिन्यात येथील एक व्यापारी, १ बांधकाम व्यावसायिक कोरोनाबाधित झाले. त्यापाठोपाठ बँकेतील कर्मचाऱ्यांनीही कोरोनाची लागण झाली. म्हणून पुन्हा एकदा व्यापारी संघटनेने कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे तीन वेळा बाजारपेठ बंद करुन व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य केले होते. आज पुन्हा एकदा सरपंच, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या भावना समजून घेवून व्यापाऱ्यांनी (काही जणांचा विरोध असतानाही) सहकार्य केले आहे.