मंगलेश कोलथरकरने दीड तासात पार केले २७ किमी अंतर
गुहागर : तालुक्यातील धोपावे येथील मंगलेश अनिल कोलथरकर या तरुणाने एक संकल्प, एक ध्येय ठेवून विजयादशमीच्या दिवशी धोपावे ते शृंगारतळी असे २७ किमीचे अंतर दीड तासात पार करून आपली अनोखी दौड पूर्ण केली. मंगलेशच्या अनोख्या दौडचे धोपावे ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले आहे.
दाभोळ खाडीकिनारी वसलेल्या गुहागर तालुक्यातील धोपावे गावातील कु. मंगलेश याला लहानपणापासूनच धावण्याची आवड आहे. आपण दसऱ्याच्या दिवशी अनोखी दौड करावी, असा संकल्प त्याने केला. त्याप्रमाणे त्याने धोपावे ते शृंगारतळी असा सत्तावीस किमी अंतराचा मार्ग निवडला. याबाबत येथील ग्रामस्थांनाही त्याने विश्वासात घेतले. ग्रामस्थांनी मंगलेशच्या या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. त्यांनी धावण्याची तयारी सुरू केली. दि. २५ रोजी विजयादशमीच्या सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंगलेशने धोपावे गावातून धावण्यास प्रारंभ केला. दीड तास कुठेही न थांबता सत्तावीस किमीचे अंतर पार केले. मंगलेश यांचा हा संकल्प व धेय्य पाहून गावातील ग्रामस्थांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.