गुहागरातील शेतकरी चिंताग्रस्त
गुहागर : तालुक्यात वेळेवर समाधानकारक पाऊस पडल्याने भात लागवडीचे कामेही वेळेत पूर्ण झाली होती. यावर्षी विक्रमी भातशेतीचे क्षेत्र लागवडीखाली आल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातशेती पिकाची तालुक्यात परतीच्या पावसाने नासाडी केली आहे.
हवामान खात्याने कोकण किनारपट्टीला पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे गेले आठवडाभर तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त दिसत आहे. चित्रा नक्षत्राच्या या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे आलेल्या पिकाची माती केलेली दिसत आहे. शेतात उभे असलेले पीक पूर्णपणे आडवे झाल्यामुळे भातशेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यातील कातळ भागातील भात शेती कापणीचे काम अंतिम टप्प्यात आले होते. मात्र, पानतळ भागातील भात शेती या पावसाने आडवी झाली आहे. यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावानंतर निसर्ग चक्रीवादळाचा फटका, यामध्ये बियाणे व खतांची झालेली प्रचंड प्रचंड भाववाढ, तसेच मजुरीत झालेली वाढ व कवडीमोल भावाने विकला जाणारा बाजारभाव यांनी त्रस्त झालेला शेतकरी अतिरिक्त खर्च करून आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतीची कामे केली. परंतु, पीक उत्तम प्रकारे आले, पण पावसाने पिकाची नासाडी केली आहे.
सध्या शेतकऱ्यांनी कापलेली पीके पाण्यावर तरंगत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. बुधवारी रात्री कोसळलेल्या धो धो पावसाने न कापलेली भात शेती आडवी झाली आहे. तर शेतातून भर पावसासारखे पाणी पुन्हा वाहू लागले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर भाताला मोड येऊन पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे. भात पीक हेच प्रमुख पीक असल्याने वर्षभर शेतात राबणारा शेतकरी याच सुगीच्या दिवसाची वाट पाहत असतो. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे पीक पाण्यात जाणार आहे. तसेच जनावरांना पेंडा पण मिळणार नाही, अशा दुहेरी संकटात तालुक्यातील शेतकरी सापडला आहे.