गुहागर:- गुहागर तालुक्यातील असोरे हे एक छोटेसे आहे. गावातील सर्वांना मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटलेले असुन मुलींचे उच्च शिक्षण चांगल्या प्रकारे सुरू आहे. गावातील विविध क्षेत्रात महिलांनी आपली यशस्वी घोडदौड सुरु केली आहे. गावाच्या सर्व प्रशासकीय पदांवर महिला राज दिसून येते. या गावाच्या प्रथम नागरिक सुद्धा महिलाच आहेत. सौ. मधुरा महेंद्र निमकर यांनी सन २०१७ मध्ये सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला आणि तो यशस्वी पणे पेलला आहे.आवरे- असोरे ग्रुप ग्रामपंचायतीचा कारभार पहात असताना सर्वसमावेशक नेतृत्व करीत आहेत. प्रसंगी कठोर शिस्त व नियमांचे काटेकोर पालन करताना त्या अजिबात डगमगत नाहीत.
कोणत्याही कार्यालयाचा प्रशासकीय कार्यभार सांभाळणे म्हणजे सोपी गोष्ट नाही पण असोरे-आवरे गावातील ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ही महिला आहेत. सौ.आदिती अमोल पवार यांनी सन २०२१ मध्ये ग्रामसेवक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना अचूक निर्णय घेण्याची क्षमता व धाडसी वृत्तीने त्यांनी दोन्ही गावांचा समतोल साधला आहे.
गावात इ.१ ली ते ७ वी पर्यंत उच्च प्राथमिक शाळा आहे. या शाळेचे मुख्याध्यापकपदी पण एक महिलाच आहेत. सौ. गीतांजली भानुदास जाधव सन २०१९ मध्ये त्यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्वीकारला. श्रमदानाचे महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिले व शाळेत श्रमदानाला सुरवात झाली.या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात त्यांनी आपल्या कारकिर्दीत केली. त्यांचे शालेय कामकाज अतिशय उत्तम असून शाळा सिद्धी मध्ये शाळा अ श्रेणीत आहे.
असोरे गावच्या पोलीस पाटील सुद्धा महिलाच आहेत.सौ. स्वाती विलास निमकर सन १९९३ मध्ये त्यांनी पोलीस पाटील पदाचा कार्यभार स्वीकारला. अतिशय कठीण पदाचा कार्यभार सुद्धा महिला असुनही खुप उत्तम प्रकारे त्यांनी सांभाळला आहे. गावात कोणतेही वाद न होता सर्व सार्वजनिक कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतात हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे.
गावात शंतनु फुड प्राॅडक्ट हा मोठा उद्योग समूह राजन निमकर यांनी सुरू केला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात त्यांची उत्पादने आज लोक आवडीने घेतात.हा उद्योग समूह यशस्वी करण्यासाठी त्यांना पत्नी नमिता राजन निमकर यांची मोलाची साथ लाभली.त्यांच्या १९९५ पासून त्या या उद्योग समूहात पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करत असून असोरे गावाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरवले व स्थानिक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.
“सावित्रीही शिकली कारण जोतिबांनी साथ दिली” या उक्ती प्रमाणे या महिलांच्या यशस्वी कार्यप्रणालीत त्यांच्या पतीची त्यांना अनमोल साथ मिळाली हेही तितकेच सत्य आहे. गावातील अनेक स्त्रिया आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना दिसत आहेत. “सावित्री च्या लेकी आम्ही शिकून मोठ्या होऊया, लेक शिकवा अभियानाची चळवळ हाती घेऊया” ही चळवळ असोरे गावात प्रत्यक्षात अनुभवता येते आहे.