आ. भास्करराव जाधव यांचे व्यवसायिकांना आश्वासन
गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील रिक्षा व्यवसायिकांपुढे निर्माण झालेल्या प्रश्नी लक्ष घालण्याचे आणि येथील रिक्षा थांब्याला अधिकृत मान्यता मिळवून देण्याचे आश्वासन आज आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी रिक्षा संघटनेला दिले. त्यामुळे शृंगारतळी आणि परिसरातील रिक्षा व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गुहागर – विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणामुळे शृंगारतळी-पाटपन्हाळे बाजारपेठेतील रिक्षा व्यवसायिकांपुढे त्यांच्या रिक्षा थांब्याला अधिकृत मान्यता नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत त्यांनी संबंधितांकडे केलेले अर्जही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या महामार्गाच्या रूंदीकरणामध्ये शृंगारतळी बाजारपेठेतील उंचीचा निर्माण झालेला प्रश्न सोडविण्यासाठी व्यापारी संघटनेच्या मागणीनुसार आमदार श्री. जाधव यांनी दि. १९ नोव्हेंबर रोजी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती. त्यात रस्त्याचा उंचीचा प्रश्न सोडवून त्यांनी बाजारपेठेतील सर्व व्यापारी, छोटे-मोठे व्यवसायिक अशा सर्वांना मोठा दिलासा दिला. याच बैठकीत येथील रिक्षा संघटनेने रिक्षा थांब्यासाठी जागा आणि त्यासाठी अधिकृत मान्यता मिळत नसल्याने लक्ष घालण्याची विनंती आ. श्री. जाधव यांना केली होती. त्यावर बैठकीतूनच त्यांनी जिल्हाधिकारी श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा यांना फोन केला होता.
या पार्श्वभूमीवर रिक्षा युनियन मालक-चालक संघटना, शृंगारतळी-पाटपन्हाळे या संघटनेचे पदाधिकारी व सर्व सदस्यांनी आज जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रवीण ओक व पंचायत समिती सदस्य श्री. सुनील पवार यांच्यासमवेत आमदार श्री. जाधव यांची चिपळूण येथे भेट घेवून निवेदन दिले आणि चर्चा केली. त्यावर आपण निष्चितपणे या विषयात लक्ष घातले आहे. गुहागर तालुक्यात पूर्वी आरटीओ कॅम्प होत नव्हता. आपण तो सुरू केला. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय दूर झाली. त्याप्रमाणेच आपल्या रिक्षा थांब्यालादेखील मान्यता मिळवून देवू, असे आश्वासन आ. श्री. जाधव यांनी त्यांना दिले.
यावेळी रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष सत्यप्रकाश चव्हाण, खजिनदार सुनील राऊत, सचिव दत्तात्रय टाणकर, राजू राऊत, सदस्य प्रवीणरहाटे, प्रकाश पाटील, प्रमोद शिरगांवकर, दिपक रहाटे, सुहास रहाटे, सुधाकर रहाटे, निलेश रहाटे, सुशील राऊत, भरत घाणेकर, सुरेंद्र पवार, प्रसाद पवार, राजू शिर्के, भाई शिर्के, चंद्रकांत रहाटे, दिलीप पाटील, मंगेश संसारे, सदानंद पवार, समीर रहाटे, संतोष मोरे, सचिन रहाटे, नारायण बारखळे, संदेश डिंगणकर, प्रसाद खांडेकर, सदानंद खांडेकर, प्रकाश रहाटे, रमेश वीर, सिध्देश रहाटे, पिंटया शिर्के, मनोज संसारे, शंकर चव्हाण, जयवंत बडदे, श्रीकांत मोरे, दिनेश संसारे, प्रसाद मांडवकर, विजय महाडिक, गणेश भोसले, बापू सुरजन आदी उपस्थित होते.