गुहागर विधानसभा उपाध्यक्ष दीपक जाधव यांना विश्वास
गुहागर : तालुकाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जि. प. गट आणि पं. स. गणातील प्रत्येक घरघरात शिरून राष्ट्रवादीचे विचार आणि विकासकामे मार्गी लावण्याचा अजेंडा पोहोचवून होऊ घातलेल्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर विधानसभा उपाध्यक्ष दीपक जाधव यांनी व्यक्त केला आहे.
श्री जाधव पुढे म्हणाले की, पक्षाने दिलेल्या पदाला योग्य आणि चांगला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पक्षाने विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकल्याबद्दल वरिष्ठांचा मी आभारी असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षबांधणीसाठी गुहागर, चिपळूण आणि खेड तालुक्यातील तालुकाध्यक्ष यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहोत. येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्या सहकार्याने मतदारसंघाचा दौरा करणार असल्याचे ते म्हणाले. गेले १० ते १५ वर्ष राजकीय क्षेत्रात काम करत आहे. माझा बांधकाम व्यवसाय असल्यामुळे गुहागर तालुक्यातील प्रत्येक गावातील वस्तीतील लोकांशी माझा थेट संपर्क आला आहे. लोकांच्या अडीअडचणीच्या काळात नेहमीच माझी सहकार्याची भूमिका राहिली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक कोंडी झाली आहे. यावर उपाय म्हणून पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सहकार्याने तालुक्यात तसेच विधानसभा मतदारसंघात असलेल्या उद्योगांमध्ये जास्तीत जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी प्रथमतः युवकांचे बायोडाटा गोळा करण्याचे काम करत आहोत. तालुक्यातील जे बेरोजगार तरुण आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता व माहिती गोळा करण्याची जबाबदारी आपण विधानसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्ष यांच्यावर सोपवली असल्याचे जाधव यांनी सांगितले.
येत्या काही दिवसांनी येणार्या २९ ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेईल यात कोणतीही शंका नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवून विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला नंबर एकचा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.