गुहागर : गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ चंद्रकांत बाईत आणि आपली ओळख असून त्यांच्या आणि आपल्या घरचे घरोब्याचे संबंध होते.गुहागर तालुक्यात येऊन आमदार झाल्यानंतर आपली ओळख झाली नसून कौटुंबिक व्यवसायातून हे नाते निर्माण झाले आहे.आबांच्या महत्वकांक्षा व आत्मविश्वास दांडगा असून त्यांनी मेहनतीने आजचे हे वैभव उभे केले आहे.त्यांचे जीवन आदर्शवत असून त्यांनी आपल्या समोर उभ्या केलेल्या आदर्शांची जपणूक आपण सर्वांनी करावी तसेच आबांचा शतकमहोत्सवी जन्मदिन साजरा करण्याचे भाग्य आपणा सर्वांना मिळावे अशी भावना आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील लोक शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष,शिक्षणमहर्षी चंद्रकांत (आबा) बाईत यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. आबांचा शिक्षण,सहकार,उद्योग यातील अनुभव दांडगा आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे.त्यांच्या या अनुभवाचा वापर समाज कल्याणासाठी त्यांनी केला आहे. आपल्या शिक्षण संस्थेच्या क्रीडासंकुलासाठी आपण निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार भास्कर जाधव यांनी दिले.तसेच सध्याच्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे त्वरित पंचनामे करून घ्यावेत आणि काही अडचण आल्यास थेट संपर्क करावा असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थितांना केले.चंद्रकात बाईत यांची ग्रंथतुला करून अभिष्टचिंतन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.आमदार भास्कर जाधव यांनी चंद्रकांत बाईत यांची ग्रंथतुला केली तसेच शैक्षणिक संकुल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कलाशिक्षक एस. के.केळस्कर यांनी चंद्रकांत बाईत यांच्या जीवनावर आधारित तयार केलेल्या जीवनपटाचे सादरीकरण करण्यात आले.आपल्या प्रास्ताविकात संचालक अविनाश कदम यांनी चंद्रकांत बाईत यांचा जीवन प्रवास उलगडून सांगताना लोकशिक्षण मंडळ आणि विविध क्षेत्रातील त्यांचे योगदान याचा आढावा घेतला.लोकशिक्षण मंडळाच्या सर्व ज्ञानशाखांच्या वतीने आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते चंद्रकांत बाईत यांचा शाल,श्रीफळ,हार,पुष्पगुच्छ आणि श्री महालक्ष्मीची प्रतिमा भेट देऊन शुभेच्छापर सत्कार करण्यात आला.चंद्रकांत बाईत त्यांच्याविषयी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुहास गायकवाड,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विद्याधर कदम, जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर यांनी विचार मांडले तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बाईत त्यांनी आगामी वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये कबड्डी स्पर्धा,आत्मचरित्र प्रकाशन,विविध स्पर्धा आदी उपक्रम घेतले जाणार असल्याचे सांगितले. संस्थेच्या शैक्षणिक संकुलात भव्य क्रीडांगणाचा मानस त्यांनी बोलून दाखवला. आपल्या सत्काराला उत्तर देताना चंद्रकांत बाईत यांनी गेल्या ७५ वर्षांच्या कालखंडातील आपल्या आठवणींना उजाळा दिला.या जीवन प्रवासात बालपणीच्या खडतर काळात अनेकांनी आपल्याला आधार दिला त्यातूनच शिकत,सावरत व्यवसायात प्रगती करत गेलो. आज काळाबरोबर चालताना आपला पारंपरिक व्यवसाय तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.अनेकांनी अनेक वर्षे आपल्यावर विश्वास दाखवला,प्रेम दिले त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेच्या शैक्षणिक संकुलात औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.या सर्व जीवनप्रवासात सौभाग्यवती कांचना, चिरंजीव सचिन,स्नुषा स्नेहल,शुभम,रजत, मुली,जावई,भावंडे आणि हितचिंतकांचे सहकार्य लाभले असून आपण यापुढेही सदैव त्यांच्यासाठी कार्यरत राहू अशा भावना व्यक्त केल्या.
अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात चंद्रकांत बाईत यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, रमाकांत साळवी,सरपंच तुकाराम पागडे, विद्याधर कदम,डॉ.एस. के.पाध्ये,गजानन लोकरे, पूर्वी निमूणकर, दत्तात्रय ओक, विलास गुरव,अनंत पवार,रमेश सुर्वे, गजानन लोकरे, दत्ताराम तेटांबे,रमेश रेपाळ, उदय नेटके,ओमप्रकाश भंडारी,संजय फासे,संतोष ढगे,अविनाश फासे, परशुराम नेटके,राकेश साळवी, कृष्णा पालशेतकर,अशोक आठवले,जसकिरण मर्दा, भाजपा तालुकाध्यक्ष नीलेश सूर्वे, सरचिटणीस सचिन ओक, पोलीस पाटील महेश भाटकर, रमेश नेटके यांसह आबलोली परिसरातील प्राथमिक-माध्यमिक शिक्षक, व्यापारी,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आबांचे वर्गमित्र,नातेवाईक,हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.व्ही.राजमाने तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक डी.डी.गिरी यांनी केले. यावेळी लोकशिक्षण मंडळाचे सर्व संचालक सभासद विविध ज्ञानशाखांचा चे कर्मचारी बाईत कुटुंबीय,नातेवाईक उपस्थित होते.