दाभोळ खाडीतील मच्छिमारांचे स्वयंभू श्री टाळकेश्वराला साकडे
गुहागर : मच्छि दुष्काळ दूर होऊ दे आणि मच्छिमारांची भरभराट होऊ दे यासाठी दाभोळ खाडीतील समस्त मच्छिमार बांधवांनी अंजनवेल येथील स्वयंभू श्री टाळकेश्वर मंदिरात अभिषेक केले.
राज्यात आधीच कोरोना विषाणूचे संकट, त्यात चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मच्छिमारांना मासेमारी हंगाम सुरू होऊन काही महिने झाले असताना जोरदार पावसासह वादळी वाऱ्याने मच्छीमारांना पुरते हैराण केले होते. मच्छी दुष्काळ आणि त्या जोडीला बदलत्या हवामानाचा मोठा फटका दाभोळ खाडीतील मच्छीमारांना बसला आहे. २०१५-१६ मध्येहि मच्छि दुष्काळाने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी सरकारकडून शेतकऱ्यांना पॅकेज दिले होते. परंतु मच्छी दुष्काळ दिसत असूनही मच्छीमारांकडे सरकारने दुर्लक्ष केले होते. आज हीच परिस्थिती मच्छीमारांवर ओढावली आहे. कोरोना संकटामुळे मच्छीला म्हणावा तसा भाव मिळत नाही. हजारो रुपयांचा डिझेल खर्चून सुद्धा खोल समुद्रात मच्छी मिळत नसल्याने मच्छीमार आपल्या बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवत आहे. सरकारकडून पॅकेज मंजूर झाले आहे परंतु, अद्यापही एकाही मच्छीमाराच्या हाती काही आलेले नसल्याचे सांगितले.
दाभोळ खाडीतील मच्छीमार आपल्यावरील संकट दूर व्हावे, यासाठी दरवर्षी अंजनवेल गावाच्या टोकाला असलेल्या स्वयंभू श्री टाळकेश्वर मंदिरात जाऊन देवाला अभिषेक करत असतात. आताही मच्छी दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी नुकतेच नवानगर मच्छिमार सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सदस्य, धोपावे, तरीबंदर, वेलदुरमधील मच्छीमार व बोट मालक यांनी टाळकेश्वर मंदिरात जाऊन देवाला अभिषेक घातला.