गुहागर विजापूर महामार्गाच्या तीनपदरीकरणात गुहागर ते चिपळूण दरम्यानच्या मार्गावरील 17 गावातील काही जमीनमालकांची जागा जात आहे. या जागांचा मोबदला देण्यासाठी चिपळूणच्या उपविभागीय कार्यालयाकडे 42.92 कोटी रुपये जमा झाले आहेत. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यावर हे पैसे संबंधित जमीनमालकांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामाने वेग घेतला आहे. चिखलीपासून मार्गताम्हानेपर्यंत सुमारे 10 कि.मी.चे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सध्या शृंगारतळी ते मोडकाआगर काम वेगाने सुरु आहे. त्यातही पाटपन्हाळे ते मोडकाआगर तीनपदरीकरणासाठी आवश्यक सपाटीकरण, भराव टाकणे, आदी कामे पूर्ण झाली असून या महिनाअखेरीस क्राँक्रिटीकरणाला सुरवात होईल. मात्र आजपर्यंत गुहागर चिपळूण दरम्यान अधिग्रहीत जागांच्या मोबदल्याचे वितरण झाले नव्हते. आता चिपळूण उपविभागीय कार्यालयाकडे मोबादला देण्यासाठीचा निधी वर्ग करण्यात आला आहे. 17 गावातील ज्या जमीनींचे अधिग्रहण करावे लागणार आहे कींवा सध्या केले गेले आहे. अशा जमीनमालकांकडून भुमिअधिग्रहणासंदर्भातील कायदेशीर पूर्तता करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मोबदला देण्यास सुरवात होईल. अशी माहिती प्रभारी प्रांताधिकारी जयराज सुर्यंवंशी यांनी दिली.