रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यात होणार्या रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडचे भवितव्य आजतरी अंधारात आहेत. प्रकल्पाला समर्थन देणारा आवाज अजूनही शासनकर्त्यांपर्यंत पोचलेला नाही. कोरोनाच्या काळातील टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या. नव्या रोजगारांची निर्मिती थांबली आहे. अशावेळी रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्सचा पर्याय समर्थपणे उभा राहिला असता तर कोकणातील बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळाला असता. ओरिसामधील अशाच रिफायनरीने प्रत्यक्षात आणलेले सत्य नाकारून चालणार नाही.
ओरिसामध्ये भुवनेश्वर जवळ जटणी येथे 46 एकर परिसरात स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभे करण्यात आले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आज दिले जात आहे. 18 मार्च 2018 मध्ये या प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन समारंभ झाला. त्यानंतर अवघ्या दोन वर्षात ५० हजार प्रशिक्षणार्थींची क्षमता असलेले हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण केंद्र इंडियन ऑईल, ओएनजेसी, एचपीसीएल, गेल, बीपीसीएल, ऑईल इंडिया लि., या ऑईल कंपन्यांबरोबर इंजिनियर्स इंडिया लिमिटेड ही अभियांत्रिकी क्षेत्रातील सल्ला देणारी कंपनी आणि ऑईल क्षेत्रात सर्व प्रकारची वहातूक करणारी बाल्मर लॉरी कंपनी यांच्या सहभागातून उभे राहिले आहे. या कंपन्यानी स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या प्रशिक्षण केंद्रासाठी 500 कोटींचा निधी दिला आहे.
या प्रशिक्षण केंद्रामध्ये ऑईल, गॅस या उद्योगांसह अन्य औद्योगिक क्षेत्रात तयार होणार्या रोजगारानुसार प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये वेल्डिंग, इलेक्ट्रीफीकेशन, फिटर, फॅब्रिकेशन, इन्स्ट्रुमेंटल टेक्निशियन, पाईप फिटर, पाईप गॅस डिस्टीब्युशन, सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन, एलपीजी मॅकेनिक, फक्त मुलींसाठी कॉम्प्युटर डाटा ऑपरेटर अशा कोर्सेची उपलब्धता आहे.
स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेणार्या आयटीआयटीच्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठी ही संस्था मदत करते. गेल्या तीन वर्षात सुमारे 3500 प्रशिक्षित विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला. शिवाय व्यवसाय करणार्या विद्यार्थ्यांना देखील संपूर्ण साह्य या संस्थेतर्फे मिळते. 2019 मध्ये या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या 11 विद्यार्थ्यांनी स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत.
याचा रत्नागिरी रिफायनरीशी संबध काय असा प्रश्न अनेकांना पडेल. तर रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स या प्रकल्पामध्ये देखील इंडियन ऑईल, ओएनजेसी, एचपीसीएल, बीपीसीएल, याच कंपन्या एकत्र आल्या आहेत. देशात दोन तीन ठिकाणी असे मोठे रिफायनरी प्रकल्प उभे करण्याचा विचार सुरू झाला तेव्हा ओरिसामध्ये या प्रकल्पाचे स्वागत झाले. प्रकल्प उभारणीसोबत 500 कोटींचे प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. कोकणात मात्र रिफायनरीचे स्वागत विरोधाने झाले. भुवनेश्वरला ज्यांच्या कल्पनेतून हे प्रशिक्षण केंद्र सुरू झाले ते बी. अशोक आरआरपीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. येथेही प्रकल्पाच्या कामासोबत प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. पण आम्ही आमच्या भविष्याची वाट अडवली.
आज प्रकल्प रद्द होण्याचे खापर दुर्दैवाने शिवसेनेवर फोडले जात आहे. पण प्रकल्प आला तेव्हा विरोधाचा सुर नेमका कुठून आला होता. याचेही आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. प्रकल्प आणणारे ग्रीन रिफायनरी, रोजगार, विकास हे मुद्दे घेवून बोलत होते. आम्ही कोकणवासी मात्र प्रदूषण, बागायती, विस्थापित होणं आदी मुद्दे घेऊन विरोधासाठी घामासोबत अश्रू ढाळत होतो. खऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या जमीनी आधीच कोणीतरी विकत घेतल्या होत्या. आता त्यांच भलं होणार याचा डांगोरो पिटत होतो. कोरोनाच्या संकटात नोकरी गमावण्यापासून धंदा उद्योगांवर झालेल्या परिणामांनी डोळे उघडलेल्या कोकणी माणसाला आता कोकणात रोजगार देणारा प्रकल्प हवाय. पण ती वेळ आजतरी निसटून गेली आहे. पुढच्या पिढीच्या रोजगाराची संधी गमावलीयं…