गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे यांची खंत
गुहागर : वर्षातून एकदा येणाऱ्या गणपतीच्या सणाला श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत लाखो भाविक मुंबईहून कोकणात येतात. मात्र घरी पोहोचेपर्यंत मुंबई-गोवा रस्त्याच्या दुर्दशेमुळे भाविकांची दुर्दशा होते. मुंबईहून गावाला घरी येण्याच्या प्रवासाला ज्या ठिकाणी सात तास लागत होते. त्या प्रवासाला तब्बल 13 तास लागले. कोलाड ते इंदापूर दरम्यान रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून मोठमोठे खड्डे पडल्याने चार-पाच तासाचे ट्राफिक झाले होते. लाखो भाविक आपल्या लाडक्या गणरायाच्या सेवेला कोकणात दरवर्षी येतात. हे माहीत असून सुद्धा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आमची शासन यंत्रणा उपेक्षा का करते, असा खडा सवाल गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे यांनी केला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच मार्गी न लागल्यास आपण भंडारी समाज संघटना व इतर समाज घटकांच्या माध्यमातून जन आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Why is our government neglecting the poor condition of the roads,This question has been asked by Bharat Shete, President of Guhagar Taluka Bhandari Samaj. He said that if the work on Mumbai-Goa highway is not completed soon, he will start mass agitation through Bhandari Samaj Sanghatana and other social elements.
केंद्रीय मंत्री नारायणराव राणे हे कोकणवासीय आहेत. गणपती सणापूर्वी पंधरा दिवस त्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली. यावेळी जरी रस्त्याचे खड्डे बुजले गेले असते तर भाविकांचा प्रवास सुखकर झाला असता. त्यांचा आशीर्वाद या जन आशीर्वाद यात्राला राणे साहेबांना लाभला असता. पोलादपूरचे रहिवासी असलेले विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर विरोधी पक्ष नेते म्हणून कोणत्याही विषयावर राज्य सरकारवर तुटून पडतात. मग या विषयावर का लक्ष देत नाहीत. खासदार सुनिल तटकरे यांनी एक महिन्यापूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना रस्त्याची डागडुजी करण्यात यावी म्हणून पत्र दिल्याचे कळते. गडकरी हे कोणत्याही रस्त्याची डागडुजी करून भाविकांचा व गणरायाचा प्रवास सुखकर करतील असा समस्त भाविकांचा विश्वास भंग झाला आहे. कोकणावर कोणाचे प्रेम आहे की नाही असा प्रश्न समस्त कोकणवासीयांना पडला आहे, असं शेटे म्हणाले.
कोकणवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या गणरायाने निद्रिस्त शासकीय यंत्रणेने वर व त्यावर वचक ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींना जागे करेलच. तसेच आपण गुहागर तालुक्यातील समस्त भंडारी समाज व इतर समाजातील सर्व भाविकांना घेऊन याबाबत लवकरच जन आंदोलन करणार आहोत व तसे निवेदन सर्व नेतेमंडळींना प्रत्यक्ष भेटून देणार असल्याचे शेटे यांनी सांगितले. गुहागर – विजापूर महामार्ग अंतर्गत येणाऱ्या गुहागर चिपळूण रस्त्याचे काम सुद्धा चालू आहे. झालेले 25 किलोमीटरचे काम पाहता हा रस्ता पुढील दहा वर्षे तरी टिकेल अशी शंका वाटते. याबाबतही आपण गुहागरवासियांना घेऊन आंदोलन करणार आहोत असे शेटे यांनी सांगितले.