गुहागर : सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून शिक्षीत युवा वर्गाला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत. ग्रामीण भागातील युवा वर्गाला नोकरी विषयक योग्य ती माहिती व मार्गदर्शन मिळावे या हेतूने गुहागर तालुक्यातील आबलोली येथील मातोश्री काॅम्प्यूटर्स व वक्रांगी केंद्र आबलोलीचे संचालक नरेश निमुणकर यांनी सुरेटा नोकरी मदत केंद्र सुरु केले आहे.
नोकरी मदत केंद्रामध्ये आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या उपलब्धतेनुसार माहिती संदेश, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा विषयक माहिती तसेच संबंधित पदाबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. गुहागर तालुका परीसरातील बेरोजगार युवक-युवतींनी या नोकरी मदत केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक नरेश निमुणकर यांनी केले आहे.
नोकरी मदत केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सदस्या पूर्वी निमुणकर, खोडदे सरपंच प्रदीप मोहिते, आंबेरे सरपंच रवींद्र अवेरे, माजी सरपंच तेजस केंबळे, नरेश निमुणकर, विशाल नेटके, प्रथमेश निमुणकर, नकुल भंडारी, सुनिता निमुणकर आदी मान्यवर उपस्थित होते. संचालिका नम्रता निमुणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.