आरजीपीपीएलकडून पाणी पुरवठा नाही
गुहागर : शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाने दिलेल्या आदेशानंतर देखील अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील प्रदूषित घरांना तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबत आरजीपीपीएल प्रशासनाने अजून पर्यंत काहीच हालचाल केली नसून शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचा लेखी आदेश धुडकावून ग्रामस्थांना वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
The RGPPL administration has so far taken no Movement and has disobeyed the written order of the government’s Pollution Control Board, incapacitating the villagers
आरजीपीपीएलचे अधिकारी याबाबत केवळ टाळाटाळ करत असून कोविडचे कारण सांगून ग्रामस्थ,कंपनी प्रशासन आणि अंजनवेल ग्रामपंचायत यांच्यात होणाऱ्या बैठकीबाबत मुद्दाम वेळ काढू धोरण अवलंबत आहेत. कंपनीचे हे असहकार्याचे धोरण पाहता पाणी प्रदूषणाबाबत आता शासनाच्या वरिष्ठ पातळीवर दाद मागण्यात येणार आहे. कंपनीच्या वीज निर्मिती प्रक्रियेसाठी अंजनवेल मधील कोनवेल या समुद्र भागातून एचडीपीई पाईपच्या मोठ्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यातील एका लाईनमधून समुद्रातील पाणी पंपाद्वारे कुलिंग टॉवरला खेचण्यात येते आणि येथील अति उष्ण झालेले तीन कुलिंग टॉवरचे टरबाईन थंड करण्यासाठी या पाण्याचा वापर होतो. टरबाईनच्या शितलीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यांनातर दुसऱ्या पाईपलाईनद्वारे येथील रसायनयुक्त, उष्ण पाणी पुन्हा समुद्रामध्ये सोडण्यात येते. प्रक्रिया करून पूर्ण झालेले हे प्रदूषित पाणी वाहून नेणारी मोठी पाईपलाईन फेब्रुवारी महिन्यात फुटली आहे. त्यामुळे याच भागातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून नैसर्गिक जलस्रोतांच्या प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. परंतु कंपनी प्रशासनाला नेमकी कुठे पाईपलाईन फुटली आहे याची माहिती अनेक दिवस नव्हती
बोरभाटलेवाडी येथून रानवी गावात जाण्यासाठीचा जुना रस्ता आहे. त्या भागाला धाकटे भेंडप असे नाव आहे. या भागात हे प्रदूषित पाणी प्रवाही झाले आहे. तेथून वाहणाऱ्या बाबाचा पऱ्याद्वारे हे रसायन व क्षारयुक्त पाणी डोंगरउतारावरू अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मिसळत आहे. ज्याठिकाणी पाईपलाईन फुटली आहे, त्याभागात पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे जमिनीची माती आणि कातळभाग भेदून जवळपास 12 फूट उंच आणि 20 फूट लांब इतका मोठा खड्डा तयार झाला आहे. ब्राह्मणवाडीतील ग्रामस्थांनी पाण्याचे अचानक वाढलेले प्रवाह आणि पाणी प्रदूषण याबाबत तक्रार केल्यानंतर कंपनी प्रशासनाला जाग आली आणि त्यांनतर याची शोधाशोध सुरु झाली.
कुलिंग टॉवरची पाईपलाईन नादुरुस्त होऊन तीन महिने होत आले तरीही अजूनपर्यंत कंपनीने येथे कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नाही. या पाईपच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले मोठे हिटर आणि जोडणी मशीन कंपनीकडे उपलब्ध नाहीये. या भागात बुलडोझर आणि पोकलेंन याच्या साहाय्याने कंपनीने मातीचा रस्ता करून ठेवला आहे. आणि चीर गेलेल्या एचडीपीई पाईपला लाकडाचा खुंटा मारून ठेवला आहे. याव्यतिरिक्त पाईपलाईन दुरुस्तीबाबत कोणतीही पावले अजून उचलली गेली नाहीत.
1999 मध्ये एनरॉच्या दाभोळ वीज कंपनीमुळे झालेल्या द्रवरूप नाफ्ता गळती या प्रदूषणाच्या गंभीर समस्येबाबत येथील त्यावेळी ग्रामस्थानी कंपनी विरोधात रिटपिटिशन दाखल केली होती. या दाव्याचा निकाल ग्रामस्थांच्या बाजूने लागला होता. त्यानुसार पाणी प्रदूषण रोखणे आणि येथील प्रदूषणग्रस्त भागाला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे असे न्यायालयाने आदेश दिले होते. सद्य स्थितीत आरजीपीपीएलने नादुरुस्त पाईपलाईनची तात्काळ दुरुस्ती करून घेणे, कोणत्याही कारणामुळे होणारे पाणी प्रदूषण रोखणे आणि प्रदूषणग्रस्त ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून बोअरवेल किंवा विहीर या स्वरूपात स्वतंत्र जलस्रोत कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे या मागण्या पूर्ण न झाल्यास आरजीपीपीएल विरोधात रिटपिटिशन दाखल करण्याचा विचार येथील ग्रामस्थांनी केला आहे.