मुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये २८ जूनपासून तिसऱ्या टप्प्यातील नियम कायम ठेवण्यात आले होते. पण आता हळूहळू राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तसेच पुरेसे बेड्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. आज दुपारी ३.३० वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राज्यातील अनलॉकबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतील लोकल आणि संध्याकाळपर्यंत दुकानं उघडी ठेवण्याबाबत निर्णय देखील घेतला जाण्याची शक्यता आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव काहीसा कमी होऊ लागल्याने राज्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्याचे दिसत आहेत. निर्बंध कशा पद्धतीने शिथील करण्यात यावेत याचा एक सविस्तर अहवालच टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. यावरच सखोल चर्चा होऊन टप्प्याटप्प्याने हे निर्बंध हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष्य लागले आहे. कारण या बैठकीमध्ये नवीन निर्णय होणे अपेक्षित आहे. कोरोनामुळे अनेक व्यवहार रखडले आहेत आणि अर्थचक्र मंदावलं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेत का? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. त्यामुळे याबाबत देखील आज मंत्रिमंडळात निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्बंध शिथिल करण्याबाबत एक सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला आहे. टास्क फोर्सच्या अहवालातील शिफारशीनुसार राज्यात सर्व आस्थापना टप्प्याटप्प्याने सुरू करताना त्यांची वेळ आणि उपस्थितीची मर्यादाही वाढविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जाणार असल्याचे समजते आहे. यात रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची वेळ रात्री १० पर्यंत केली जाणार असून ५० टक्क्यांची मर्यादाही काही प्रमाणात शिथील केली जाणार असल्याचे समजतेय. यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक असेल. तसेच लसीकरण झालेल्या ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे समजते.