कोरोना काळातील नवदुर्गा -संतोष वरंडे
गुहागर : कोरोना महामारीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे काम केले अशा गुहागर शहरातील सात आशा सेविकांचा जीवनश्री प्रतिष्ठान संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला.
कोरोना सारख्या महामारीच्या साथीत सर्व हतबल झाले असताना महाराष्ट्र शासनाने राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम राबविला. त्यामुळे गेल्या काही दिवसात कोरोना साथ आटोक्यात आलेली दिसत आहे. या सर्वांना अनेक घटक कारणीभूत असले तरीहि त्यात आशा सेविकांचे काम अधोरेखित करण्यासारखे आहे. घरोघरी फिरून साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती व रुग्ण शोधण्यासाठी त्यांनी केलेले काम कौतुकास पात्र ठरते. अशा गुहागर शहरातील आशा सेविका सुप्रिया संदीप कदम, विंदा विक्रम जाधव, साक्षी आदेश मोरे, दिक्षा दीपक माटल, संजना संदीप ठोंबरे, निधी नितीन सुर्वे, अनघा सुहास कचरेकर या सात कोविड युद्धांचा जीवनश्री प्रतिष्ठान गुहागर संस्थेने त्यांच्या कामात उपयोगी होईल, अशा वस्तूंचे भेट देऊन सन्मान केला.
यावेळी बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे म्हणाले, शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदरी हा उपक्रम राबविला. हा उपक्रम यशस्वी होताना दिसत आहे. शासनाचा हा उपक्रम प्रत्येक घरपट पोहोचण्याचे काम आशा सेविकांनी जीवावर उध्दार होऊन केल्याने आज त्या खऱ्या अर्थाने नवदुर्गा आहेत. कोरोना काळात आपण सर्व घरी बसलो असताना त्या संकटाचा सामना करताना दिसत होत्या. यापुढे काम करताना स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाचीहि काळजी घ्यावी, असे आवाहन वरंडे यांनी केले.
या कार्यक्रमाला जीवनश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे, उपाध्यक्ष सिद्धिविनायक जाधव, सचिव निलेश गोयथळे, खजिनदार डॉ. मयुरेश बेंडल, संचालक गजानन साळवी, नितीन बेंडल, सुधाकर कांबळे, मनोज बोले, ओंकार वरंडे, संचालिका तथा माजी नगराध्यक्षा स्नेहा वरंडे, विजय सावंत, मधुकर गंगावणे, सल्लागार गणेश धनावडे आदी उपस्थित होते.