गुहागर : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग रस्ता रुंदीकरणात चिपळूण-गुहागर मार्गावरील लहान मंदिरे हलवावी लागत आहेत. मात्र मोडकाआगर शृंगारतळी दरम्यान श्रृंगारतळीच्या वेशीवर असलेल्या दगडदेवाचे (गडगोबा) स्थान न हलविण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे पाटपन्हाळे, शृंगारतळीतील ग्रामस्थांनी दगडदेवाचे स्थानी श्रीफळ वाढवून आनंद व्यक्त केला.
सध्या गुहागर विजापूर महामार्गाच्या तीन पदरीकरणाचे काम मोडकाआगर ते श्रृंगारतळी दरम्यान वेगाने सुरु आहे. या मार्गावर पाटपन्हाळे थांब्यानंतर शृंगारतळीच्या वेशीजवळ दगडदेवाचे स्थान आहे. येथे कोणतेही मंदिर नाही. केवळ वर्षानुवर्ष असलेला दगडांचा ढीग पहायला मिळतो. या स्थानी स्वयंभू शंकराची पिंडी आहे. असे सांगितले जाते. अत्यंत महत्त्वाच्या कामाला जाताना परिसरातील ग्रामस्थ या स्थानी एक दगड ठेवतात. श्रध्देने नमस्कार करतात. त्यामुळे महत्त्वाचे काम मार्गी लागते. अशी ग्रामस्थांची श्रध्दा आहे. या श्रध्देतूनच येथे दगडांचा ढीग झाला आहे. कोणी याला दगडदेव म्हणत तर कोणी गडगोबा. अनेक वर्षांपूर्वी येथे गंगा अवतीर्ण झाली होती. अशी माहिती पोलीस पाटील सत्यप्रकाश चव्हाण यांनी सांगितली. त्याला पुरावा म्हणून रस्त्याच्या कडेलाच सहज दिसणार नाही अशा ठिकाणी, दगडदेवाच्या समोर असलेला पाण्याचा हौद किंवा छोटी विहीर दाखविली जाते. आहे. परंतु आजपर्यंत या विहीर सदृष्य हौदात कोणीही पडलेला नाही. किंवा अपघातही झालेला नाही.
महामार्गाच्या कामात दगडदेव तथा गडगोबाचे स्थान हलवू नये. अशी विनंती पाटपन्हाळेमधील ग्रामस्थांनी केली होती. रस्त्याला लागणारी पर्यायी जागा पाटपन्हाळे गावचे ग्रामस्थ सत्यप्रकाश चव्हाण यांनी विनामोबदला देण्याचे मान्य केले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दगडदेव अर्थात गडगोबाचे स्थान न हलविण्याचा निर्णय घेतला. नव्याने होणारे तीन पदरीकरणाचे काम गडगोबाचे दोन्ही बाजुने होणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार यांनी हे स्थान टिकविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाटपन्हाळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. गडगोबाचे ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येवून श्रीफळ वाढवले. यावेळी सरपंच संजय पवार, पोलीस पाटील सत्यप्रकाश चव्हाण, अनंत चव्हाण, ग्रामविकास मंडळ अध्यक्ष सुधाकर चव्हाण, प्रकाश चव्हाण, नंदकुमार भेकरे, उदय चव्हाण, पाटपन्हाळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाधव, महामार्ग प्रकल्प मॅनेजर शर्मा आदी उपस्थित होते.
तीन पदरीकरणाच्या कामानंतर सदर स्थान विकसीत करण्याचा निर्णय पाटपन्हाळेमधील ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यावेळी गुहागरकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी हे देवस्थान आकर्षण बिंदू ठरेल. असे येथील ग्रामस्थ अनंत चव्हाण यांनी सांगितले.