पाटपन्हाळे ग्रामपंचायतीत पार पडली संयुक्त बैठक
गुहागर, ता. 19 : शृंगारतळी बाजारपेठतील रस्त्याची उंची कमी ४ फुटाने कमी करणे. पूर्वीपासून रस्त्यावर बांगड्या आदी सामान विकणाऱ्या महिलांना स्वतंत्र जागा उपलब्ध करुन देणे. बाजारपेठे परिसरातील वीजवाहिन्या जमीनीखालुन टाकणे. आदी महत्त्वपूर्ण निर्णय आज शृंगारतळीत पार पडलेल्या बैठकीत झाले. यामध्ये आमदार भास्कर जाधव यांनी जनतेच्या हितासाठी आग्रही भुमिका घेतली.
गुहागर विजापूर महामार्गाची शृंगारतळी बाजारपेठेतील उंची सुमारे 6 फुटापेक्षा जास्त होती. त्यामुळे बाजारपेठेत अनेक समस्या निर्माण होणाऱ्या होत्या. या संदर्भात पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात सभा झाली. या सभेला आमदार भास्कर जाधव, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, तहसीलदार गुहागर, ठेकेदार यांच्यासह व्यापारी, दुकानदार, रिक्षाचालक आदी उपस्थित होते. जनतेच्या समस्या अधिकाऱ्यांनी समजून घेतल्या. त्यातून मार्ग काढण्याची आग्रही भुमिका आमदार भास्कर जाधव यांनी घेतली. त्यासाठी प्रसंगी आमदार जाधव यांनी जिल्हाधिकारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना सभेतूनच फोन केला.
या सभेमध्ये शृंगारतळी बाजारपेठेतील रस्त्याची उंची १ ते २ फुट करण्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराने मान्य केले. त्यासाठी बाजारपेठेच्या दोन्ही बाजुला 1 ते 1.5 पर्यंत रस्त्याच्या उंचीतही बदल करावे लागणार आहेत. शृंगारतळी बाजारपेठे दरम्यान पालपेणे, मळण, वेळंब, जानवळे, शृंगारी मोहल्ला याकडे जाणारे रस्ते मुख्य रस्त्याला जोडलेले आहेत. मुख्य रस्त्याचे काम करताना या रस्त्यांकडे जाणारा मार्गही वहातुकीस सुलभ होईल असा बनविण्याचे ठेकेदाराने मान्य केले. बाजारपेठ परिसरात रस्त्याखालुन गेलेल्या जलवाहिन्या पूर्ववत करुन द्याव्यात. दुभाजक बांधुन द्यावेत. मुख्य रस्त्या ११ मिटरचा असून त्यापलिकडे गटार आणि पादचारी मार्ग असेल. याच पादचारी मार्गावर ग्रामपंचायत आणि व्यापारी संघटनेने मिळून पूर्वीपासून रस्त्यावर दुकान थाटणाऱ्या महिलांना जागा उपलब्ध करुन द्यावी. अशा सूचना यावेळी आमदार जाधव यांनी केल्या.
शृंगारतळी बाजारपेठेत वीजवाहिन्यांचे जाळे आहे. महामार्गाचे काम करताना या वीजवाहिन्या जमीनी खालून न्याव्यात अशी सूचना महावितरणचे कार्यकारी अभियंता लवेकर यांना फोनद्वारे आम. जाधव यांनी केली. तर रिक्षाचालकांना स्टॅण्डसाठी जागा मिळावी यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही फोन केला. अशा पध्दतीने सभेत उपस्थित केलेल्या सर्व समस्यांवर तेथेच निर्णय झाले. त्यामुळे शृंगारतळीतील व्यापारी, दुकानदार, रिक्षा चालक, रस्त्यावर दुकान मांडणारे व्यावसायिक या सर्वांनी आमदार भास्कर जाधव यांचे आभार मानले आहेत.
या सभेला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता शेख, प्रभारी प्रांताधिकारी जयराज सुर्यंवंशी, गुहागर तहसीलदार, उपअभियंता मराठे, जिल्हा परिषद सदस्य प्रविण ओक, पंचातय समितीचे उपसभापती सुनील पवार, पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवार ठेकेदार शिवाजी माने, तालुका प्रमुख सचिन बाईत उपस्थित होते.