सर्व पर्यटन स्थळांवर गर्दी
गुहागर : संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढवले होते. या महामारीचा सर्वाधिक फटका हा जगातील पर्यटन स्थळांना बसला होता. कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू असलेले गुहागरहि त्यातून सुटले नाही. गेली दीड वर्षे अडखळत चाललेल्या पर्यटन व्यवसायाने यावर्षा अखेरीस गती घेतलेली पहावयास मिळत आहे. तालुक्यातील सर्वच ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरलेली दिसत आहेत.
The Corona crisis had engulfed the entire world.The worst hit areas were the world’s tourist destinations. Guhagar, a tourist destination in the Konkan, has not escaped. The tourism business, which has been stumbling for the last one and a half years, is finally gaining momentum by the end of this year. Tourists are flocking to all the historical and tourist places in the taluka and hotels, lodges, home stays and dining places.
गुहागरमध्ये शाळा व महाविद्यालयाच्या परिक्षा संपल्यानंतर पर्यटक दरवर्षी मोठी गर्दी करतात. तालुक्यात या पर्यटन हंगामात दिवसाला सुमारे ६५०० पर्यटक येत असतात. यामध्ये सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या जास्त असते. दरवर्षी पर्यटकांच्या या वाढलेल्या संख्येमुळे गुहागरातील पर्यटनाला गेल्या काही वर्षात सुगीचे दिवस आले आहेत. परंतु, दीड वर्षांपूर्वी गुहागरच नव्हे तर राज्यातील सर्वच पर्यटन व्यवसायावर कोरोनाचे संकट कोसळले होते. लॉकडाऊनमुळे तालुक्यातील हॉटेल, लॉज व घरगुती राहण्याच्या ठिकाणांना कोरोना महामारीचा मोठा फटका बसला होता.
निसर्गसौंदर्याबरोबरच लांबलचक समुद्र चौपाटी लाभलेल्या गुहागरची ओळख राष्ट्रीय पातळीवर केव्हाच पोहोचली आहे. प्राचीन मंदिरासह प्रेक्षणिय पर्यटन स्थळांमुळे पर्यटक दरवर्षी मोठया संख्येने येत असतो. वर्षातून नाताळ सुट्टी व ३१ डिसेंबरला गुहागर पर्यटकांनी फुल्ल होऊन जातो. तर एप्रिल महिन्यात मुलांच्या परिक्षा झाल्यानंतर शाळ महाविद्यालयाच्या सुट्ट्यामुळे व कडाक्याच्या उन्हामुळे मुंबई, पुणे व अन्य ठिकाणचे पर्यटक कोकणात धाव घेतात.
तालुक्यात सुमारे ४५ हॉटेल, ३५ एमटीडीसी निवासस्थाने व ६५ घरगुती निवास आणि राहण्याची व्यवस्था आहे. पूर्वी गृहागरला धावती भेट देऊन जाणारा पर्यटक दीड वर्षीचा कोरोना काळ वगळता आता सलग तीन दिवस वास्तव्य करु लागला आहे. एवढेच नव्हे तर गुहागरात राहून आता गणपतीपुळे व दापोलीतील पर्यटन स्थळे पाहून पुन्हा गुहागरात येऊ लागला आहे. ही येथील पर्यटन सोयी सुविधामूळे शक्य झाले आहे. गुहागर हे पर्यटकांसाठी सुरक्षित असल्याने कौटुंबिक पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असते. बहुचर्चित एरॉनचा दाभोळ पॉवर प्रकल्प बंद पडल्यानंतर बेरोजगारीचे मोठे संकट तालुक्यावर आले होते. अशा परिस्थितीत निसर्गसौंदर्याने नटलेल्या पर्यटनाने येथील जनतेला रोजगार उपलब्ध करुन दिला. त्यामुळे येथील नागरिकांना रोजगाराचा प्रश्ना म्हणावा तसा भेडसावत नाही. हा तालुका आता एकंदरीतच पर्यटन व्यवसायावरच जास्त अवलंबू आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे येथील पर्यटन व्यावसायिकांची बिकट अवस्था निर्माण झाली होती. या व्यवसायावर अवलंबून असलेले समुद्रातील बोटीग, घोडेस्वार, उंट सफरी, खाद्य पदार्थांचे स्टॉल अन्य लहान व्यावसायिकांवरहि उपासमारीची वेळ आली. काही व्यावसायिकानी पर्यटकांसाठी सोयी सुविधा निर्माण करून देण्यासाठी बँकेतून घेतलेले कर्ज फेडताना तारेवरची कसरत आजही करावी लागत आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगार कमी करण्यात आले. पर्यटक आलेच नाही तर रोजगार कसा मिळणार असा, प्रश्न त्यांना पडला होता.
कोरानाच्या दुसऱ्या लाटेने तर तालुक्यातील अनेक नागरिकांचे प्राण घेतले. कोरोनाच्या भीतीने पर्यटक गुहागरात फिरकत नव्हते. परंतु, जसे लॉकडाऊन शिथिल झाले तसे मुंबई, पुणे व अन्य शहरी भागातील पर्यटक पुन्हा गुहागरात पर्यटनासाठी येऊ लागले आहेत. डिसेंबर महिन्याची सुरुवात ही पर्यटकांच्या गर्दीने झाली आहे. ३१ डिसेंबरसाठी गेल्या पाच दिवसांपासून सर्व हॉटेल, लॉज घरगुती राहण्याची ठिकाणे फुल्ल झाली आहेत. येणारे पर्यटक कोरोनाची बंधने पाळून वावरत आहेत.
तसेच गुहागर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या खाद्यपदार्थ स्टॉलवर प्रशासनाने अतिक्रमणामुळे काही दिवसांपूर्वीच कारवाई केली होती. या कारवाईने व्यवसायिकांनी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने गुहागर पोलीस परेड मैदानाच्या परिसरात आपली खाद्यपदार्थाचे स्टॉल उभारून पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरविण्यास सज्ज झाले आहेत. केवळ डिसेंबर महिनाच नाही तर पर्यटकांची सद्याची गर्दी पाहता गुहागरचे पर्यटन दिवसेंदिवस बहरताना दिसणार आहे.