दि कलिननच्या सौंदर्य स्पर्धेत द्वितीय, उत्कृष्ट फोटोजेनिक फेस अवार्डने सन्मानित
गुहागर : पुण्यातील दि कलिनन या संस्थेने आयोजीत केलेल्या महाराष्ट्र आयकॉन 2020 या स्पर्धेत गुहागरमधील कु. तन्वी गजानन बावधनकर ही द्वितीय क्रमांकाची (सेकंड विनर) विजेती ठरली. तसेच फोटोजेनिक फेस अवार्डने तन्वीला सन्मानित करण्यात आले. दि कलिनन ही संस्था पुण्यात फॅशन शोचे आयोजन करणारी संस्था आहे.
दि कलिनन या संस्थेने महाराष्ट्र आयकॉन 2020 या स्पर्धेकरीता ऑनलाइन अर्ज मागविले होते. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तन्वीने हा अर्ज भरला होता. यामध्ये महाराष्ट्रातील 60 जणांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांच्याकडून आलेल्या माहितीच्या आणि फोटोंच्या आधारावर दि कलिनन संस्थेने स्पर्धेसाठी 30 जणांची निवड केली. कोरोनामुळे प्रत्यक्ष स्पर्धा घेण्यात येणार नव्हती. त्यामुळे या 30 स्पर्धकांना फॅशन डिझाईनमध्ये महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या रॅम्प वॉकसाठी बोलावली. रॅम्प वॉकच्या परिक्षणातून 20 जणांची निवड पुढील स्पर्धेसाठी करण्यात आली. पुढील प्रश्र्नोत्तरांची फेरी ऑनलाइन झाली. त्यामधुन 10 स्पर्धकांची निवड करण्यात आली. या 10 स्पर्धकांना विविध पोशाखातील आणि विविध पोझमधील फोटो पाठविण्यास संस्थेने सांगितले. यासाठी पोझ आणि ड्रेसची निवड संस्थेने केली होती. हे फोटो दि कलिनन कडे पोचल्यावर परिक्षकांनी पुन्हा एकदा संपूर्ण स्पर्धेचे व्हिडिओ परिक्षण केले. त्यानंतर विजेत्यांची नावे निश्चित करण्यात आली. 29 नोव्हेंबरला सायंकाळी कोथरुड येथे स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी अंतिम विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. त्यामध्ये गुहागरमधील तन्वी गजानन बावधनकर हीला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आणि बेस्ट फोटोजनिक फेसचा अवार्ड मिळाला.
यशानंतर काय म्हणाली तन्वी….
शालेय जीवनात अभ्यासापलिकडे आपण काही करु शकतो असा विचार केला नव्हता. मात्र आता इंजिनीयर होवून नोकरीला लागल्यावर आपण वेगळं काहीतरी करावं अस सारखं वाटत होतं. त्यातच इन्स्टाग्रामवर या स्पर्धेची जाहिरात पाहीली आणि स्पर्धेत भाग घेतला. या स्वरुपातील माझी ही पहिलीच स्पर्धा होती. त्यामुळे प्रश्र्नोत्तर, रॅम्पवॉक याबद्दल फार काही माहिती नव्हते. मात्र युट्युबवरुन अन्य स्पर्धा पाहून थोडीफार तयारी केली. ऑनलाइन स्पर्धा असल्यामुळे थोडं कमी दडपण होतं. पहिल्याच स्पर्धेत क्राऊन (मुकुट) मिळाल्याचा मोठा आनंद होता. स्पर्धेमुळे आत्मविश्र्वास वाढलाय. स्वत:ची वेगळी ओळख मिळाली आहे. गंमत म्हणजे पहिलीच स्पर्धा असल्याने आईबाबांना याबाबत काहीच सांगितले नव्हते. विजेती ठरल्यानंतर जेव्हा पुण्यातून फोन केला तेव्हा त्यांनाही आर्श्चयाचा धक्का बसला.
प्रवास तन्वीचा….
गुहागरमधील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमध्ये तन्वी शिकत होती. त्यावेळी सीबीएसई बोर्डाच्या आरजीपीपीएलमधील बालभारती पब्लिक स्कुल या शाळेत विद्यार्थ्यांना घेवून जाण्याचे काम तन्वीचे वडिल गजानन बावधनकर करत असतं. स्वाभाविकपणे बालभारतीच्या मुख्याध्यापिका श्रीमती वनजा क्षीरसागर या तन्वीला ओळखत होत्या. त्यांनी तन्वीला बालभारती शाळेत पाठविण्याचा आग्रह धरला. म्हणून गजानन बावधनकर यांनी तन्वीला इ. ८ वी.पासून बालभारती शाळेत पाठविण्यास सुरवात केली. तन्वीची हुशारी, शाळेतील विविध उपक्रमातील सहभाग यामुळे शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापिका क्षीरसागर मॅडम यांनी तन्वीला पाठिंबा दिला. 9 वी, 10 वी ला या शाळेत दुसरी भाषा म्हणून संपूर्ण संस्कृत अनिवार्य होते. या विषयाची तयारी सौ. पाटणकर मॅडमनी करुन घेतली. त्यामुळे 9, आणि 10 वी च्या चारही सेमिस्टरमध्ये तन्वी शाळेत संस्कृत विषयात पहिली आली. दहावीनंतर क्षीरसागर मॅडमच्या मार्गदर्शनातून तन्वीने रत्नागिरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर तन्वीने नोकरीचचा मार्ग स्विकारला. आज पुण्यात नोकरी करत असतानाचच तन्वी पुणे विद्यापीठात बहिस्थ विद्यार्थी (एक्सटर्नल) बी.ए.पूर्ण करत आहे. शिवाय नोकरी आणि अभ्यास सांभाळत तिने एमपीएससीची (आरटीओ) परीक्षा दिली. हा अभ्यास देखील ती घरातूनच केला. पहिल्या प्रयत्नाचे वेळी केवळ १ गुणासाठी संधी गेली. मात्र हार न मानता पुन्हा ती याच परिक्षेचा अभ्यास करत आहे.

