गुहागर : गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या पत्रानंतर रत्नागिरी जिल्ह्यातीलच नाही ही तर अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ही त्यांच्या जिल्ह्यातच नजिकच्या ठिकाणी सीईटी परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाल्याने गुहागर तालुका युवा सेनेच्या वतीने आमदार भास्कर जाधव यांचे आभार मानण्यात आले.
सीएटी परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्याबाहेर म्हणजेच मुंबई, ठाणे, कोल्हापूर याठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आले होते. कोरोनाच्या वातावरणामुळे बाहेर जाऊन परीक्षा द्यावी लागणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण होते. अनेक विद्यार्थ्यांनी ही बाब आमदार भास्कर जाधव यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनीही तात्काळ दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवून सीईटी विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती केली होती. या पत्राची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री यांनी केवळ रत्नागिरी जिल्ह्यातीलच नाही तर अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही त्यांच्या जिल्ह्यातच नजीकच्या ठिकाणी परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी गुहागर दौऱ्यावर आलेल्या आमदार भास्कर जाधव यांचे युवा सेना तालुका अधिकारी अमरदीप परचुरे यांनी युवासेना व तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानले.