गुहागर पंचायत समिती मासिक सभा
गुहागर : गुहागर तालुक्यातील अंगणवाड्या व शाळांना पुरविण्यात येणाऱ्या निकृष्ट पोषण आहारावरुन पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी चांगलाच गदारोळ केला. जोपर्यंत चांगल्या दर्जाचे पोषण आहार मिळत नाही, तोपर्यंत निकृष्ट पोषण आहार न स्वीकारण्याचा ठराव करण्यात आला.
गुहागर पंचायत समितीची मासिक सभा सभापती पूर्वी निमुणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत पंचायत समितीच्या अतर्गत येणाऱ्या सर्व विभागाचा आढावा सादर करण्यात आला.
पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी अंगणवाडीमध्ये पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहाराची पाहणी केली. गेल्या मासिक सभेत या विषयावर वादळी सभा झाली होती. तरीही संबंधित ठेकेदाराने निकृष्ट पोषण आहार पुरविणे चालू ठेवले आहे. सभेतूनच जि. प .रत्नागिरी येथील जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी, यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यांनी काही प्रत्युत्तर दिले नाही. यामुळे सभेत होणाऱ्या विषयावर कोणतेच निर्णय होत नसतील तर अशा प्रकारचा निकृष्ट पोषण आहार एकाही अंगणवाडीमध्ये यापुढे स्विकारला जाणार नाही असा ठराव करण्यात आला. तसेच संबंधित ठेकेदाराची गाडी सायंकाळी उशिरा अंगणवाडी मध्ये धान्य घेऊन येत असते तसेच घाईगडबडीत पोषण आहार उतरवला जातो, पुढील अंगणवाडीमध्ये पोषण आहार द्यायचा आहे असे सांगून काही प्रमाणात कमी पोषण आहार देऊन पुढे मार्गस्थ होतो. तो गेल्यानंतर पाहणी केली असता दिलेल्या संख्ये पेक्षा पोषण आहार मिळत नाही. तसेच पोषण आहाराच्या पाकीटा मध्ये मोठ्या प्रमाणात भुंगे असतात, परिणामी पोषण आहार स्वीकारू नये यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांची एक बैठक बोलावून त्यांना अशाप्रकारे सूचना करण्यात यावी अशी भूमिका सदस्यांनी घेतली.
महावितरणने अजूनही अनेक ठिकाणचे धोकादायक विज काम बदलले नाहीत. घरावरून जाणाऱ्या विज वाहिन्यां ही तशाच आहे त्यामुळे ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना ही महावितरण प्रशासनाला देण्यात आल्या. तालुक्यात दहा ग्रामसेवकांच्या जागा रिक्त आहेत त्यामुळे त्या जागा भरण्याची मागणी करण्यात आली. आरोग्य विभागाकडून सध्या लसीकरणाची मोहीम सुरू असून तालुक्यात कमी कर्मचारी असताना आरोग्य विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी परस्पर बदलीचे आदेश कसे काय देतात यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक आरोग्यसेविकांचि पदे रिक्त असून शासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चाही यावेळी करण्यात आली.
दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो मात्र टँकरग्रस्त गावांची मागणी कायम राहते.प्रशासन सर्वच गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करू शकत नाही. खाजगी टँकर चालक यांना प्रशासकीय दर परवडत नाही यावर उपाययोजना म्हणून जल जीवन मिशन आखण्यात आला असून सन 2020 ते2021 चे प्रत्येक ग्रा. प.चे आराखडे बदलून एकूण निधीच्या २५ टक्के पाण्यावर व २५ टक्के स्वच्छतेवर खर्च करण्याचे ठरले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आत्तापर्यंत ३४ आराखड्यांना मंजुरी दिली आहे. या मुळे पुढील दोन ते तीन वर्षात पाणी समस्या दुर होईल अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले यांनी दिली. तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले यांच्या संकल्पनेतून तालुक्यात” मिशन मॅथेमॅटिक्स ” हा नवा उपक्रम शिक्षण विभागाच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. याची सुरुवात अंजनवेल शाळा नंबर २ अडुर शाळा नंबर ,१ येथे प्रायोगिक तत्त्वावर होणार आहे .तसेच तालुक्यातील सर्व शाळांमध्ये हा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे यापूर्वी विविध चित्रे ,विचारांनी बोलक्या झालेल्या भिंती आता गणिती भाषा बोलणार आहेत.
या सभेला गुहागर तालुका कृषी कार्यालयचे एकही अधिकारी उपस्थित नव्हता. सतत तीन सभांना कृषी कार्यालयाचे अधिकारी गैरहजर राहत असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना पत्र काढून त्यांच्याकडून कारणे मागवण्यात यावी अशी सूचना सिताराम ठोंबरे यांनी केली.
या सभेला विभावरी मुळे, पुनम पास्टे,सिताराम ठोंबरे, रवींद्र आंबेकर, स्मिता धामणस्कर, पांडुरंग कापले, गटविकास अधिकारी अमोल भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले व तालुक्यातील सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.