भाद्रपदात गणेश चतुर्थीला गुहागर न्युजच्या कामाला सुरवात झाली. अनंत चतुदर्शीला गणपती विर्सजनाच्या लाईव्ह इव्हेंटने आम्ही तुमच्या पर्यंत पोचलो. आणि २ सप्टेंबरला आई व्याघ्रांबरीचा आशिर्वाद घेवून गुहागर न्युज हे वेब पोर्टल खऱ्या अर्थाने सुरु झाले. अवघ्या महिनाभरात गुहागर न्युजशी आपण सर्वजण जोडले गेलात. गुहागर, रत्नागिरी, मुंबई, पुणे येथील मित्रपरिवार, नातेवाईक, गुहागरकर हे वेब पोर्टल स्विकारतील. याची खात्री होती. पण त्याशिवाय महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील गुहागरकरांनी आम्हाला प्रतिसाद दिला. इतकेच नव्हतर देशात अन्य राज्यात रहाणारे कोकणवासी आणि विशेष करुन परदेशात रहाणाऱ्या कोकणावासियांनी देखील आमच्यावर विश्र्वास दाखविला. त्यामुळेच एक महिन्याच्या कालावधीत साता समुद्रापार पोचलेल्या गुहागर न्युजने 15 हजार युजर्सचा ( 16243) टप्पाही पार केला. आज गुहागर न्युजवरील बातम्या दररोज वाचणाऱ्यांची संख्या 700 ते 800 आहे. अर्थातच आम्हाला मिळालेल्या या यशात तुम्हा सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणूनच गुहागर न्युजच्या टीमच्या वतीने आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ! गेल्या महिनाभरात गुहागर न्युजच्या बातम्या वाचून अनेकांनी फोन, संदेशांद्वारे आमचे अभिनंदन केले. काहींनी प्रतिक्रियाही पाठविल्या. अर्थातच या प्रतिक्रिया आमच्यासाठी बहुमुल्य आहे. त्या आज एक महिन्याच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने इथे शेअर करीत आहे.
सर्वप्रथम आपले खूप खूप धन्यवाद आणि गुहागर न्यूज च्या पुढील यशस्वी वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा… येणाऱ्या काळात आपले हे न्यूज पोर्टल आपल्या गुहागरची एक नवी ओळख असणार आहे. आपल्या या प्रयत्नामुळे तालुक्यातील प्रत्येक घडामोडी आमच्या पर्यंत येत आहेतच शिवाय एक गुहागरकर म्हणून जगाशी जोडले आहोत… पुन्हा खूप खूप शुभेच्छा….
– श्री. नयन गंगाराम कावणकर , गिरगाव, मुंबई ( गाव: असगोली, हुंबरवाडी)
मी गेले काही वर्ष कोंकण परिसरातील बातम्यांसाठी सोशल मीडिया तसेच वेगवेगळे वृत्तपत्र व त्यांच्या वेबसाईट वर दिवसातून एकदा तरी भेट देत असे पण गुहागर न्यूज़ सुरु झाल्या पासुन मला बकी कोणत्या ही वेबसाईट वर भेट देण्याची गरज भासली नाही या वेबसाईट वरचे लिखाण अणि संदर्भ खरोखरच खुप सुंदर रितीने प्रेजेंट करण्यात आले आहेत.
तुम्ही सगळ्यांनी पत्रकारिता एक नेक्स्ट लेवल ला घेऊन गेल्या बद्दल हार्दीक अभिनंदन अणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
– डॉ. वैभव दळी, धोपावे
पत्रकार म्हणून कित्येक वेळा धाडसी पाऊल उचलता आणि समाजाचे प्रतिनिधित्व करता. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. पत्रकाराचे काम समाजाचे प्रबोधन करणे आणि जागरूकता आणणे हे होय . कित्येक वेळा आपण चांगले काम करून सुद्धा प्रोत्साहन किंवा कौतुक होत नाही हे देखील मान्य . अशा वेळेस स्वःत आपल्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी ही विनंती . आपला पत्रकारितेचा हेतू समाजकल्याणचा, समाजाचे प्रबोधन करण्याचा आहे. हे आपले कार्य अविरत चालू ठेवावे . यश अपयश याची काळजी नसावी. जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या. जे काही घडत आहे त्यात आपला सिंहाचा वाटा आहे हा आत्मविश्वास नेहमी ठेवा . तुमच्यातील निखळ पत्रकाराला माझा सलाम आणि पुढील कार्य साठी खूप खूप शुभेच्छा.
– अविनाश भोसले, मुंबई (उद्योजक)
गुहागर न्युज हा चांगला उपक्रम आहे. तुम्ही पाठवलेल्या बातम्या मी नेहमी वाचते. वेब पोर्टलद्वारे गुहागरची नवी ओळख झाली आहे. याचा आम्हाला निश्चित आनंद आहे.
– सौ. नमिता वैद्य, आबलोली (शिक्षिका)
आपण विविध प्रकारच्या बातम्या देत आहात. याबद्दल अभिनंदन. पत्रकारीतेचे स्वरुप बदलतयं. प्रिंट मिडियातील पत्रकारांनी वेगळं पाऊल उचलण्याची गरज आहे. यापुढे डिजिटल आणि सोशल माध्यमे हीच पत्रकारितेची ओळख बनणार आहे. त्यामुळे सातत्य राखून हा मार्गावर चालत रहा. वेगवेगळे प्रयोग करत आहात.
– किशोर कुलकर्णी (ज्येष्ठ पत्रकार, निवृत्त संपादक)
अशा अनेक प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोचल्या. आपणा सर्वांचे प्रेम असेच लाभत राहो ही पुन्हा एकदा ईश्वरचरणी प्रार्थना.
अवघ्या महिनाभरातील मिळालेले छोटेसे यश
- कोविड केअर सेंटर वेळणेश्र्वर येथील कचऱ्यासंदर्भात बातमी दिली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून कचरा उचलण्याची व्यवस्था मार्गी लागली.
- ज्ञानरश्मी वाचनालयाची बातमी व व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर वाचनालयाला अनेकांनी फोन करुन देणगीविषयी सांगितले.
- माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाचा व्हिडिओचे आरोग्य विभागाने कौतुक केलच. शिवाय हा व्हिडिओ आरोग्य पथकातील सदस्यांनाही शेअर केला.
- मोडकाआगर धरणाचा व्हिडिओ पाहून अनेकांनी सद्यस्थिती दाखविल्याबद्दल धन्यवाद दिले.
गुहागर न्युजविषयी इथे काही लिहावे असे आवश्यक नाही. परंतु एखाद्याला याबद्दलची माहिती हवी असल्यास त्यांनी आमच्या https://guhagarnews.com/about-us/ या लिंकवर जावे. तेथे गुहागर न्युजची सर्व माहिती मिळेल.
आपण सध्या https://guhagarnews.com/ वेबपोर्टलसह फेसबुक, व्हॉटसअप हा माध्यमांचा प्रभावी वापर करत आहोत.
फेसबुक पेज ची लिंक https://www.facebook.com/NewsGuhagar ही आहे. आपल्याला शक्य असल्यास या पेजचे फॉलोअर व्हावे ही नम्र विनंती.
युट्युबवर Mayuresh Patankar हा गुहागर न्युजचाअधिकृत चॅनेल आहे. तरी आपण युट्युबवरील न्युज चॅनेलही सबस्क्राईब करावा ही विनंती.
या महिन्यापासून आपण व्हॉटसॲपवर ग्रुप बनविण्यास सुरवात करत आहोत. या ग्रुपची लिंक आपल्यापर्यंत पोचले. आपण सर्वांनी या लिंकद्वारे गुहागर न्युजला जोडून घेवू या. जेणेकरुन अधिकाधिक लोकांपर्यंत पोचणे आम्हाला सहजी शक्य होईल.