खासदार सुनील तटकरेंच्या गुहागर दौऱ्यात नियुक्त्या जाहीर
गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद गेले अनेक महिने रिक्त होते. मंगळवारी दि. १३ रोजी गुहागर दौऱ्यावर आलेले खासदार सुनील तटकरे यांनी तालुकाध्यक्षपदी जेष्ठ कार्यकर्ते, साहित्यिक, विविध संघटनांचे पदाधिकारी असलेले राजेंद्र आरेकर यांच्या नावाची घोषणा केली. तर गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षपदी दीपक जाधव तर तालुकाध्यक्ष पदाचे तिसरे इच्छुक विजय मोहिते यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती केली.
तालुकाध्यक्ष रामचंद्र हुमणे यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर गेले अनेक महिने हे पद रिक्त होते. त्यातच कोरोना संकटामुळे तालुकाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लांबणीवर पडला होता. तालुकाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र आरेकर, विजय मोहिते आणि ठेकेदार आणि पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते दीपक जाधव हे तिघे इच्छुक होते. या पदासाठी तिघांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी कोणाची निवड होते याची उत्सुकता पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्यांना लागून राहिली होती.
मंगळवारी गुहागर दौऱ्यावर कामांचा आढावा घेण्यासाठी आलेले पक्षाचे जेष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांनीच पक्ष संघटनेच्या नियुक्त्यांचा विषय उपस्थित केला. त्यावेळी तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या तिघांनीही पक्ष देईल तो निर्णय मान्य असेल असे जाहीरपणे सांगितले. खासदार तटकरे यांनी पक्षाला जिल्हा सरचिटणीस, विधानसमा मतदारसंघ उपाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष अशा तिन पदांची नियुक्ती करायची आहे. आपण कोणत्या पदासाठी स्वत:हून इच्छुक आहात असेही विचारले. मात्र त्यावेळी या तिघांपैकी एकानेही उत्तर दिले नाही. अखेर पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घेतली. तिघांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र आरेकर यांच्या नावाची घोषणा खासदार तटकरे यांनी केली. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर तालुका युवती अध्यक्षपदी मृणाल विचारे यांची निवड करण्यात आली.
राजेंद्र आरेकर हे गुहागर शहरातील शिवाजी चौक येथे रहातात. ते ३५ वर्ष एस.टी. महामंडळाच्या गुहागर आगारामध्ये लेखा शाखाधिकारी म्हणून काम करत होते. राजेंद्र आरेकर हे कवी आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी गुहागरमध्ये साहित्य चळवळ सुरु केली. मराठी साहित्य परिषदेची गुहागरमधील शाखा सुरु होण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गुहागरमध्ये जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय साहित्य संमेलन एकहाती यशस्वी करून दाखवली आहेत. शहरातील ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष झाल्यानंतर या वाचनालयामार्फत त्यांनी अनेक उपक्रम राबविले. प्रगतशील शेतकरी असलेल्या आरेकर यांनी गुहागरमधील पहिले शेततळे बांधले. त्यावर केळीची बाग फुलवली. ॲग्रो टुरिझम ही संकल्पना नवीन असताना शहरातील पहिले कृषी पर्यटन संकुल त्यांनी उभे केले.
घरामध्ये सुरुवातीपासूनच काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठका होत असल्याने ते पूर्वीपासूनच राजकारणात सक्रीय होते. राष्ट्रवादीचा सक्रीय कार्यकर्त्या या नात्यांने त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सहदेव बेटकर यांच्या प्रचारात सहभाग घेतला. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. आगामी निवडणुका व पक्षाला नवी संजीवनी देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मागणीप्रमाणे गुहागर तालुका राष्ट्रवादी पक्षाची जबाबदारी राजेंद्र आरेकर यांच्याकडे सोपविली आहे. या नियुक्ता जाहीर झाल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार संजय कदम, रमेश कदम, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ही निवड माझा एकट्याची नाही. आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाची आहे. कोणतेही गटतट न ठेवता सर्वांना सोबत घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे पक्षाचे संघटन कौशल्य अधिक मजबूत करेन.
राजेंद्र आरेकर