ज्ञानरश्मी वाचनालयाच्या सभागृहाला डॉ. तानाजीराव चोरगेंचे नाव
गुहागर, ता. 16 : शहरातील 70 वर्ष जुन्या ज्ञानरश्मी वाचनालयाच्या इमारतीचे नुतनीकरण होत आहे. नव्या इमारतीमधील सभागृहाला रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांचे नाव देण्यात येणार आहे. तसा ठराव ज्ञानरश्मी वाचनालाच्या कमिटीने मंजूर केला आहे.
भारत प्रजासत्ताक झाला त्याच दिवशी (26 जानेवारी 1950) गुहागरमधील ज्ञानरश्मी वाचनालयाचे उद्घाटन झाले होते. 70 वर्षांपूर्वीच्या वास्तूचे नुतनीकरण सध्या सुरु आहे. वाचनालयाच्या नव्या वास्तूमध्ये बाल विभाग, महिला विभाग, वाचन कक्ष, देवघेव कक्ष, स्पर्धा परिक्षांसाठी अद्ययावत संगणकीकृत अभ्यासिका आणि सभागृह बांधण्यात येणार आहे. या सभागृहाला डॉ. श्री. तानाजीराव चोरगे यांचे नाव देण्याचा ठराव बीनविरोध मंजूर करण्यात आला. या ठरावात म्हटले आहे की, डॉ. श्री. तानाजीराव चोरगे यांनी नाटक, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र लिहिले आहे. सहकार क्षेत्राला मार्गदर्शन करणारे विविधांगी लिखाण त्यांनी केले आहे. अशा मान्यवर साहित्यिकाचे नाव वाचनालयाच्या सभागृहाला दिल्याने वाचनालयाची वैचारिक श्रीमंती वाढेल. त्यामुळे डॉ. श्री. तानाजीराव चोरगे यांचे नाव सभागृहाला देण्यात यावे. तसेच त्यांचे तैलचित्र सभागृहाच्या दर्शनी भागात लावण्यात यावे.
नुकतीच ज्ञानरश्मी वाचनालयाच्या कमिटीची सभा झाली या सभेत हा ठराव गुहागर हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक अशोक आठवले यांनी मांडला. ॲड. संकेत साळवी यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. डॉ. तानाजीराव चोरगे यांनी झेप या आत्मचरित्रासह 11 कथासंग्रह, 4 नाटके, 1 एकांकिका. याशिवाय 4 कृषीसंबधित पुस्तके असे साहित्यलेखन केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सलग 16 वर्ष चेअरमन म्हणून काम करताना सहकार क्षेत्रातील 6 मानाचे पुरस्कार बँकेला मिळवून दिलेत. मांडकी पालवण, ता. चिपळूण येथे अध्यापक, कला वाणिज्य शाखेचे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, कृषी संशोधन केंद्र असे शैक्षणिक क्षेत्रातही योगदान आहे. समाजासाठी असे चौरस काम करणाऱ्या व्यक्तिचा योग्य सन्मान व्हावा. म्हणून ज्ञानरश्मी वाचनालयाने हा निर्णय घेतला असल्याचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी सांगितले.