11 ग्रामपंचायती बिनविरोध, ३ गावात प्रत्येकी एक जागा रहाणार रिक्त
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवारीला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यापैकी 11 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. एकूण 239 ग्रामपंचायत सदस्यांसाठी 372 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर भातगांव, शिवणे, कोळवली या ३ बिनविरोध ग्रामपंचायतींमधील प्रत्येकी १ जागा रिक्त राहीली आहे. आज झालेल्या छाननीमध्ये पडवे, मळण आणि भातगावमधील प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्यामुळे एकूण उमेदवारांनी संख्या आता 369 झाली आहे.
गुहागर तालुक्यातील रानवी, भातगांव, पालपेणे, नरवण, पिंपर, शिवणे, उमराठ, पेवे, साखरीआगर, कोळवली, आणि कोसबिवाडी या 11 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र कोळवली, भातगांव व शिवणे या गावांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांची प्रत्येकी १ जागा रिक्त रहाणार आहे. वेळणेश्र्वर, जामसुद आणि साखरी बुद्रुक या दोन गावांमध्ये देखील ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र अखेरच्या क्षणी एका प्रभागातून दोन पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. येथील ग्रामस्थांनी बिनविरोधचा प्रयत्न अजून सोडला नसून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत कदाचित येथे बदल घडू शकतो. उर्वरित 15 ग्रामपंचायतीपैकी तळवली मध्ये 9 जागांसाठी 16 उमेदवार, मुंढर मध्ये 7 जागांसाठी 16, पडवेमध्ये 11 जागांसाठी 26, अडूरमध्ये 11 जागांसाठी 21 , काताळे मध्ये 9 जागांसाठी 23, गिमवीमध्ये 9 जागांसाठी 26 उमेदवार, निगुंडळ मध्ये 7 जागांसाठी 14, मासुमध्ये 7 जागांसाठी 16, कोंडकारुळ मध्ये 11 जागांसाठी 15, मळण मध्ये 9 जागांसाठी 15, शीर मध्ये 9 जागांसाठी 12, काजुर्ली मध्ये 7 जागांसाठी 16, कुडली मध्ये 9 जागांसाठी 15 उमेदवार रिंगणात आहेत. येथील निवडणुका चुरशीच्या होतील. गोळेवाडी, कोसबीवाडी येथे एकाच प्रभागात निवडणूक होणार आहे.