थकीत वेतन देण्याचे आगार व्यवस्थापकांचे आश्वासन
गुहागर : गुहागर आगारातील कर्मचा-यांना मागील माहे मे व जून महिन्यामधील पगार शासकीय आदेशानुसार पुर्ण द्यावयाचे असुनहि कर्मचाऱ्यांना अपुर्ण पगार तर काहींना पगार दिलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व महाराष्ट्र एसटी कामगार सेना गुहागर आगाराचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष महेश नाटेकर गुहागर आगाराला भेट देऊन कर्मचाऱ्यांचा माहे मे, जुन, जुलै पगाररासंबंधीचा प्रश्नाबाबत कर्मचा-यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यासंबंधी आगार व्यवस्थापकांशी सकारात्मक चर्चा केली असता आगार व्यवस्थापकांनी सर्व कर्मचाऱ्यांचा थकीत वेतन देण्याबाबत आश्वासन दिले आहे.कोरोना संकटामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका एसटी बसला बसला होता. बस सेवा बंद केल्याने बस चालक, वाहक व अन्य कर्मचारी यांचे पगार थांबले. काहींना अर्धा तर काहींना महिन्याचा पगारच मिळाला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. गुहागर आगारात याबाबत कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत आपल्या कुटुंबियांसोबत आगरासमोर आंदोलन केले. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला गुहागर तालुका शिवसेनेने पाठिंबा देत आगार व्यवस्थापक व तहसीलदार यांच्याशी चर्चा घडवून आणली. त्यामुळे सुरवातीचे पगार मिळाले. दरम्यान, आता राहिलेल्या पगाराबाबत शिवसेनेने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना साथ दिली आहे.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. महेश नाटेकर, श्री.राकेश साखरकर, श्री. सुर्वे यांचे गुहागर आगारातील महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांकडून आभार व्यक्त करण्यात आले.