गुहागर, ता. 18 : फिरण्यासाठी गुहागरमध्ये रहायला आल्यापासून कोरोना सुरक्षेचा सुखद अनुभव मी आणि माझे कुटुंब घेत आहोत. गुहागर हे पहिल्यापासून माझ्या आवडीचे पर्यटन स्थळ आहेच. पण कोरोनाच्या पार्श्र्वभुमीवरही सुरक्षेच्या दृष्टीने गुहागर नं. १ चे डेस्टिनेशन आहे. अशी प्रतिक्रिया मुंबईतील वैभव रिसबुड यांनी गुहागर न्युजशी बोलताना दिली.
दिवाळी पाडव्याला वैभव रिसबुड प्रथमच मुंबईतून फिरण्यासाठी गुहागरला आले. येथील अद्वैत होम स्टेमध्ये रिसबुड कुटुंबाचे स्वागत सॅनिटायझर, टेम्परेचर गन आणि ऑक्सिमिटरने झाले. सर्वांची तपासणी झाल्यावर सॅनिटाईझ केलेली खोली त्यांना देण्यात आली. त्याच दिवशी मंदिरे खुली झाली होती. त्यामुळे रिसबुड कुटुंब कुलदेवता दुर्गादेवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. तेथेही अशीच तपासणी झाली. सर्वांची नोंदणी करण्यात आली. हातपाय स्वच्छ धुतल्याशिवाय मंदिरात प्रवेश मिळाला नाही.
याबाबत बोलताना वैभव रिसबुड म्हणाले की, कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभुमीवर पर्यटकांची येथे काळजी घेतली जात आहे. हा अनुभव आमच्यासाठी सुखद होता. मंदिरात पुन्हा तोच अनुभव आल्याने कोरोनाच्या काळातही आम्ही गुहागरमध्ये सुरक्षित आहोत. हा विश्र्वास दृढ झाला. मुंबईवर कोरोनाचे एवढे मोठे संकट आले. शहरात गर्दी आहे. तरीही तेथे कोरोनाची काळजी लोक घेत नाहीत. याउलट गुहागरमध्ये फिरताना येथील स्थानिक मंडळी मास्क लावतात. सुरक्षित अंतर ठेवतात. हे पाहुन गुहागर केवळ सुंदर पर्यटन स्थळ नव्हेतर सुरक्षा बाळगणारेही गाव आहे. याची अनुभूती आम्ही घेत आहोत.