गुहागर : आज २७ सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” (“World Tourism Day) म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली. कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती. पर्यटन (tourism)आणि हॉटेल (hotel) क्षेत्र या दोन्हींचा संबंध अनन्यसाधारण आहे. प्रवासात मुक्कामाची सोय करण्याचे काम एकमेकांच्या सहाय्याने केले जाते. यावर आकर्षक सवलती देऊन ग्राहक मिळवण्याकडे कल असतो. जवळ जवळ एक लाख कुशल मनुष्यबळाची गरज सध्या या व्यवसायाला आहे.
कोकणातील सुंदर हिरवेगार उंच डोंगर-दऱ्या झरे- धबधबा- उंच माङ- नारळ पोफळी- सुपारींच्या, आंबा- काजूच्या बागा, पुरातन मंदिरे विस्तीर्ण समुद्र किनारे, मनमोहक सृष्टीसौदर्याने भरलेली पवित्र देवभूमी- परशुराम भूमी असे विविध गोष्टी कोकणात आहेत. येथील थोर पुरुष मंडळी- लोकमान्य बाळगंगाधर टिळक, स्वा. सावरकर, साने गुरजी, डॉ. बाबासाहेब आंबडेकर अनेक थोर नररत्नांची कोकण भूमी आहे. या सुंदर कोकणातील डोंगराच्या कुशीत अथांग समुद्रकिनारा लाभलेले आमचे सर्वांचे आवडते. पर्यटकांचे हक्काचे माहेरघर “गुहागर ” ! सुमारे ७ कि.मी विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेलं आमचे हे सुंदर गुहागर.
गेली सुमारे २० वर्षे कोकणात पर्यटक येण्यास सुरुवात झाली. कोकणात सुंदर टुमदार व कौलारु- चिरंबंदी अशी घरे, नारळ – पोफळी, आंबा – काजूच्या बागा व डोंगर किनारे, प्राचिन मंदिरे यांची निसर्ग निर्मित रचना आहे. त्याची पर्यटकांना भुरळ पडते. या भागातील पूर्वी रस्ते फार मोठे झालेले नव्हते व गुहागर बद्दल फारशी प्रसिद्धी झाली नव्हती. अलिकडेच गेली १५ ते २० वर्षात सुधारणा झाली आहे. कोकणात देशी-विदेशी पर्यटक ही आवर्जून भेट देऊ लागले आहेत. फॅमिली पर्यटन वाढू लागले आहे. आम्ही पर्यटन उद्योजक त्यांचे स्वागत करण्यासाठी नक्कीच तयार असतो.
पर्यटकांच्या आवडी निवडीनुसार त्यांचे आवडीचे रुचकर- स्वादिष्ट असे छान जेवणाचे पदार्थ-विशेष म्हणजे येथील शाकाहारी भोजन – सर्वांना आवडते. वालाची उसळ- पालेभाज्या, ओले काजूगर भाजी-भाकरी, उकडीचे मोदक, आमरस, थालीपीठ व त्याच बरोबर मांसाहारी पदार्थांची रेलचेल आहेच. समुद्रातील ताजे-ताजे मासे- पापलेट, सुरमई, बांगडा, कोळंबी, खेकडा, मांदेली असे अनेक प्रकारचे मासे, तसेच चिकन व मटणचे प्रकार व हॉटेल-अन्नपूर्णा येथील स्पेशल-सोलकढी ग्राहकांना खूप आवडते.
गुहागरला अपरांत भूमी पर्यटन विकास संस्था, श्री. व्याडेश्वर व दुर्गादेवी देवस्थान यांच्या माध्यमातून मागील ५ वर्षे कोकणातील कला व खाद्य संस्कृती येथील वारसा पर्यटन कसे आहे, याकरिता गुहागर बीच फेस्टीवलचे उत्तम नियोजन करुन सर्व सदस्यांनी गुहागरची विशेष ओळख पर्यटकांच्या मनात तयार केली आहे. पर्यटक आज ही या फेस्टीव्हलची आठवण काढतात. तसेच गुहागर पत्रकार संघाच्या वतीने येथे पर्यटन वाढीसाठी विषेश प्रयत्न केले जातात.
या मागील हेतू हाच असतो की, कोकणातील संस्कृती जगभरात पोहोचावी व सर्व पर्यटक आपल्या फॅमिली- मित्र मंडळीसह कोकणात म्हणजेच गुहागरला आवर्जुन यावेत. त्यांनी चार – सहा दिवस मुक्काम करुन येथील सृष्टीसौदर्य न्याहळावे. येथील ग्रामीण भागात जाऊन वेळणेश्वर व हेदवी येथील प्राचिन मंदिर, गुहागरचा विस्तीर्ण समुद्र किनारा पहावा. गोपाळगड किल्ला, टाळकेश्वर मंदीर, लाईट हाऊस, अंजनवेल या ठिकाणी आवर्जुन फिरावे. गुहागर मधील प्राचिन श्री देव व्याडेश्वर मंदिर, श्री दुर्गादेवी मंदीर, वाळुकेश्वर मंदिर, हेदवीचे श्री दशभुजा लक्ष्मी गणपती मंदीर अनेक पर्यटकांचे श्रद्धास्थान आहे. उंच डोंगरावर अष्टवणे स्वयंभु गणपती मंदीर, असून तेथून गुहागरचे निसर्ग सौदर्य अधिक छान दिसते. अशी अनेक पुरातन मंदिरे तालुक्यात सुस्थितीत आहेत.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे आम्हा पर्यटन व्यवसायिकांना गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पण आता ऑगस्ट महिन्यापासून पर्यटक हळूहळू आपली काळजी घेत व कोरोनाचे नियम पाळत बाहेर पडत आहेत. कोकणात पर्यटकांनी आवर्जुन यावे त्यांचे आम्ही कोकणवासीय पर्यटन उद्योजक स्वागत करण्याकरिता तयार आहोत. कोकणातील पूर्वीचा नागमोडी वळणाचा सुंदर मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था खुप बिकट झाली आहे. सध्या या महामार्गाची कामे सुरू आहेत. ती लवकरच पूर्ण होऊन पर्यटकांना सुंदर महामार्ग तयार व्हावा. याकडे शासनाने अधिक लक्ष दयावे. महामार्ग झाल्यावर कोकणात माणुस अवघ्या ५ तासांचे आत नक्की प्रवास करु शकेल. पण एकच खंत वाटते की, पर्यटन वाढ होण्यासाठी कोकणात रस्ते- महामार्ग सुरळीत व्हावेत. त्याप्रमाणे समुद्राकडे जाणारे मार्ग मोठे करुन पार्कीग व्यवस्था व पर्यटकांना सुलभ शौचालय/ सोयी उपलब्ध करणे, दिशादर्शक बोर्ड लावणे, प्रत्येक तालुक्याच्या पर्यटनस्थळांवर, समुद्रकिनारी प्रशिक्षित लाईफगार्ड, स्वच्छता राखणे, याकरिता कर्मचारी, प्लास्टीक मुक्त पर्यटन व्हावे, तसेच बीचवरती वॉटर स्पोटर्स सुविधा चालू व्हावी, गुहागरमध्ये बीच पॉलिसी महाराष्ट्र शासनाने जाहीर केली आहे. त्याची अंमलबजावणी करुन गुहागर मधील स्थानिक उद्योजकांना त्याचा लाभ मिळावून द्यावा. येथील पर्यटन उद्योग तसेच फळ प्रक्रिया- कोकण प्रॉडक्ट उद्योग वाढीसाठी अधिक लक्ष द्यावे.
कोकणातातील पर्यटन उद्योग मोठा व्हावा. देशाच्या विकासामध्ये पर्यटनाचे योगदान खूप महत्वाचे आहे. सुदैवाने महाराष्ट्र अशा पर्यटन स्थळांनी समृध्द आहे. चला आपण हा मौल्यवान ठेवा जतन करण्यासाठी पावले उचलू या ! जागतिक पर्यटन दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि कोकण सुजलाम् सुफलाम् व्हावा हि सदिच्छा !
श्री.शामकांत शांताराम खातु
हॉटेल अन्नपूर्णा, गुहागर