12 जानेवारीला विवेकानंदालय उद्घाटनासह तीन कार्यशाळा
गुहागर, ता. 11 : विवेकानंद जयंतीचे दिवशी 12 जानेवारीला वेळणेश्र्वर येथे महिला बचतगट, शेतकरी आणि बागायदार यांच्यासाठी तीन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपर फाट्यावरील साथ साथ चॅरीटेबल ट्रस्टच्या विवेकानंदालयाच्या इमारतीमध्ये या कार्यशाळा होणार आहेत.
साथ साथ चॅरीटेबल ट्रस्टला वेळणेश्र्वर येथील जोशी कुटुंबाने 2.5 एकर जमीनी देणगी म्हणून दिली आहे. या जमीनीमध्ये 4 कोटी 79 लाख 20 हजार रुपयांचा ग्रामविकास प्रकल्प उभा रहात आहे. 19 जून 2017 रोजी जमीनीमध्ये 100 वृक्षांची लागवड प्रकल्पाच्या कामाला सुरवात झाली. गेली चार वर्ष ग्रामविकासांतर्गत परिसरातील शाळांमध्ये एस.एस.सी. परिक्षा मार्गदर्शन वर्ग घेतले जात आहेत. याशिवाय वेळणेश्र्वरमध्ये सर्वसाधारण तपासणी, दंतचिकिन्सा, नेत्रतपासणी, हृदयविकार तपासणी शिबिरांचे आयोजनही ट्रस्टने केले आहे. कोकणातील नाचणीचे महत्त्व, उत्पादनवाढ आणि मुल्यवर्धन या विषयासंदर्भातही ट्रस्ट शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहे.
ग्रामविकास प्रकल्पाचे केंद्र असलेल्या विवेकानंदालयच्या इमारतीचे पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाली आहे. या इमारतीचे उद्घाटन 12 जानेवारीला विवेकानंद जयंतीचे दिवशी सकाळी 9 वा. देणगीदार गोखले यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्ताने सत्यनारायणाची पूजा आयोजीत करण्यात आली आहे. तसेच ग्रामविकास प्रकल्पाअंतर्गत महिला बचतगट, शेतकरी आणि बागायदारांसाठी ३ कार्यशाळा होणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत महिला बचतगटांसाठी व्यावसायिक स्तरावर पापड बनविण्याची कार्यशाळा आहे. या कार्यशाळेला माणदेशी फौंडेशनच्या कार्यकर्त्या मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 2 ते 4 या वेळेत विवेकानंद रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेतर्फे नाचणीचे उत्पादन आणि मुल्यवर्धन या विषयावर कार्यशाळा आहे. दुपारी 3 ते ४ या वेळत शेतकरी व बागायदारांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानातून बनविलेल्या उत्पादनांची माहिती व उपयोग या विषयावर माहिती सत्र होणार आहे. या कार्यशाळांना गुहागर तालुक्यातील महिला बचतगट, शेतकरी व बागायतदार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टचे शरद जोशी यांनी केले आहे.