गुहागर, ता. 23 : तालुक्यातील वेळणेश्र्वर वाडदई ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गावात बैठकांचे सत्र सुरु आहे. कोरोना संकटाला गावाने एकजुटीने तोंड दिले. या यशानंतर गावात नवा पायंडा पडु पहात आहे. पुढील दोन दिवसांत वेळणेश्र्वरमधील चित्र स्पष्ट होणार आहे.
कोरोना संकटात वेळणेश्र्वरच्या ग्रामस्थांनी संपूर्ण गावातील वाड्या आणि ज्ञातींचे प्रमुखांना सोबत घेवून ग्रामसमिती बनविली. या समितीचा निर्णय सर्वांवर बंधनकारक राहील याची काळजी घेतली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करुन ग्रामसमितीने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण गावाने केली. परगावातून आलेला ग्रामस्थाला 14 दिवसांचे विलगीकरण, रेशनच्या धान्याची घरपोच सेवा, ग्रामस्थांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूं आणण्यासाठी एक वाहन, प्रत्येक घरातील व्यक्तीची तपासणी असे विविध उपक्रम ग्रामसमितीने यशस्वी केले. त्यामुळे गावातील वातावरणही सौहार्दपूर्ण बनले. गावात भांडण, तंटे विसरुन एकत्र झाला. तत्कालिन उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव यांनी गावाला भेट देवून ग्रामस्थांचे कौतूक केले.
आज या वातावरणाचा फायदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी होत आहे. वेळणेश्र्वर गावात ४ प्रभागातून ११ ग्रामपंचायत सदस्य निवडून द्यायचे आहेत. ही निवड बिनविरोध होण्यासाठी ग्रामसमिती कार्यरत झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर प्रत्येक वाडीची बैठक झाली. त्यामध्ये बिनविरोधचा विषय मान्य झाला. त्यानंतर चारही प्रभागांच्या 2 वेळा बैठका झाल्या. गाव म्हणून एकत्र बैठकांचा सिलसिला सध्या सुरु आहे. प्रत्येक प्रभागातील आरक्षण पाहुन उमेदवारांची निवड करताना सर्व पक्षांना यथोचित न्याय देणे, सरपंच पदासाठी उमेदवार निवडताना त्याचा कालावधी, सक्षम उमेदवार असे विविध मुद्दे गावाच्या बैठकीत चर्चेद्वारे सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. पुढील दोन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याकडे सर्वांचाच कल आहे. त्यामुळे वेळणेश्र्वर सारखी तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत देखील नवा पायंडा पाडणार का याची उत्सुकता सर्वांना लागून राहीली आहे.