गुहागर तालुक्यातील गिमवी येथील प्रकार
गुहागर : सह हिस्सेदारांची कोणतीच संमती न घेता मुखत्यार पत्राचा गैरवापर करून गुहागर तालुक्यातील गिमवी येथील किशोर उर्फ किसन गंगाराम रावळे यांनी सत्य माहिती लपवून ठेवून शासनाची फसवणुक करुन खोटे खरेदीखत नोंदविल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिन विक्री करुन हस्तातरित केल्या प्रकरणी किशोर रावळे यांच्यासह त्यांना सहकार्य करणाऱ्या अन्य दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करावे. तसेच केलेले खरेदीखत व झालेले आदेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी श्रीमती शामल शशिकांत फणसेकर, श्रीमती रेणुका रमाकांत भोईर, श्रीमती विमल सुनील चव्हाण, श्रीमती वनिता वसंत रावळे यांनी गुहागर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गिमवी गावात शासनाची फसवणूक करून खोटे खरेदीखत करण्याची ही दुसरी घटना आहे.
By misusing the power of attorney without the consent of the co-stakeholders It has come to light that Kishor alias Kisan Gangaram Rawale from Gimvi in Guhagar taluka has cheated the government by hiding the true information and registered a false purchase deed.
गुहागर तालुक्यातील मौजे हेदवी/गिमवी येथील स. नं. / गट नं. 8.400, 410, 422, 526, 814, 1640 व 1642 तसेच खाते क्र. 28 मधील इतर जमिन मिळकती या वडीलोपार्जीत मालकीची असून कब्जेवहिवाटीत आहेत. सदर जमीन मिळकती वडील कै. गंगाराम बालाजी रावळे व आई कै. सरस्वती गंगाराम रावळे (मृत्यु दि. 06 मे 2006) यांच्या मृत्यु पश्चात वारसा हक्काने प्राप्त जमीन मिळकती आहेत. सदर जमीन मिळकतीत सर्व हिस्सेदारांना समान हक्क व अधिकार प्राप्त आहेत. असे असताना सदर जमीन मिळकतीची देखभाल करण्याकरिता व शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता गिमवी सुतारवाडी येथील हिस्सेदार यांचा भाऊ श्री. किशोर उर्फ किसन गंगाराम रावळे यांच्या सांगण्यावरुन व विनंतीवरुन श्रीमती रेणुका रमाकांत भोईर हि वगळता उर्वरित सह हिस्सेदारांनी किशोर उर्फ किसन गंगाराम रावळे यांनी तयार करून आणलेल्या मुखत्यार पत्रावर भावावरील असलेल्या विश्वासापोटी न वाचता सही करुन दिले होते. त्यानंतर श्रीमती रेणुका भोईर (7/12 उता-या प्रमाणे कमल रमेश भोईर) यांच्याकडे अधिकार पत्राची मागणी केली असता तिने मुखत्यार पत्रावर सही देण्यास नकार दिला. त्यामुळे किशोर रावळे यांनी वाद उपस्थित करुन “नको देऊ सही, मला काही फरक पडत नाही, मी बाकीच्यांच्या सहया यापूर्वीच घेतलेल्या आहेत. आपल्या सर्व जमीन मिळकती विकुन टाकीन, तुला पत्ता पण लागु देणार नाही”, अशाप्रकारची धमकी दिली. व त्या दिवसापासून सर्वांशी संपर्क तोडुन टाकला.
दरम्यान, सह हिस्सेदार कै. अनंत गंगाराम रावळे यांचा दि. 9 डिसें. 2015 रोजी मृत्यु झाला आहे. तर कै. वसंत गंगारम रावळे यांचा देखील दि. 6 फेब्रु. 2016 रोजी मृत्यु झाला आहे. त्यानंतर अन्य हिस्सेदारांनी वारंवार किशोर रावळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे यापूर्वीच त्यांनी वर्तमानपत्रात जाहिर नोटीस देऊन मुखत्यारपत्र रद्द केले होते. जेव्हा किशोर रावळे गावी वडिलोपार्जीत घरात सणानिमित्ताने किंवा काही प्रसंगाने येतात तेव्हा श्रीमती शामल ऊर्फ मंदाबाई शशिकांत फणसेकर या वडिलोपार्जीत घरात राहणा-या त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी देतात. तसेच सदर वडिलोपार्जीत घरातून निघुन जावे असे टोचून बोलत असतात.
ऑनलाईन सातबारा उतारे काढले असता, या सर्वांना मोठा धक्काच बसला. कारण, त्यांच्या वडीलोपार्जीत नावे असलेल्या जमीन मिळकतीपैकी सर्वे/गट नं. 814 ची मिळकत भाऊ किशोर उर्फ किसन गंगाराम रावळे यांनी गावातील व्यक्ती सुरेश गंगाराम बारे यांना विक्री केल्याचे खरेदीदार या नात्यात संबंधीत 7/12 सदरी आमच्या नावाची नोंद कमी होउन खरेदीदाराच्या नावाची नोंद झाली असल्याचे दिसून आले. किशोर रावळे हे फसवणुक करत आहेत, ही बाब लक्षात आल्यावर हिस्सेदारांच्या मालकीची सह/गट नं. 814 ची मिळकत सुरेश बारे यांचे नाव कशी झाली याची खात्री करण्यासाठी दुय्यम निबंधक, गुहागर यांच्या कार्यालयात दि. 30 सप्टें. 2021 रोजी झालेल्या खरेदीखताची दुय्यम प्रत काढली असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण सदर खरेदीखत हे बनावट मुखत्यार पत्राच्या आधारे त्यांनी 22 जाने. 2009 रोजी उप विभागीय अधिकार चिपळूण यांच्याकडे जमिन विक्रीसाठी परवानगी मिळण्याकरिता अर्ज सादर केला होता. आणि सदर बनावट कागदत्रांच्या आधारे त्यांना जमिन विक्रीकरिता दि. 29 जाने. 2009 अन्वये परवानगीही देण्यात आली. बनावट मुखत्यार पत्राचा गैरवापर करुन, त्या अनुषंगाने सदर जमीन मिळकतीचे हस्तांतरण झालेले आहे असे सह हिस्सेदारांच्या लक्षात आले. परंतु सदर खरेदीखत नोंद करतेवेळी घोषणापत्रात नमुद केल्याप्रमाणे मुखत्यार पत्र लिहुन देणार पैकी कोणीही मयत झालेले नाही असे लिहिलेले आहे. परंतु, सदर खरेदीखत नोंद करण्यापूर्वीच सरस्वती गंगाराम रावळे ही दि. 6 मे 2006 रोजी मयत झाली आहे. यावरही न थांबता किशोर राबळे यांनी अर्जदार श्रीमती रेणुका रमाकांत भोईर सातबारा उता-याप्रमाणे (कमल रमेश भोईर) हिच्या ऐवजी स्वत:ची बायको कुमुदिनी किशोर उर्फ किसन रावळे हिला उभे करुन तीला अर्जदार श्रीमती रेणुका रमाकांत भोईर सातबारा उता-याप्रमाणे (कमल रमेश भोईर) या नावाने मुखत्यार पत्रावर सौ. कुमुदिनी किशोर रावळे यांचा फोटो लावून खोटी सही करायला लावली आहे.
आमची फसवणूक करून श्री. सुरेश गंगाराम बारे यांच्या नावाने करण्यात आलेले खरेदी खत रद्द करण्यात यावे, उप विभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण यांचे आदेश देखील रद्द करण्यात यावेत. गट क्र. 814 क्षेत्र हे.आर. 0-28-0 याचा 7/12 व फेरफार रद्द करण्यात यावा. तसेच सदरील खरेदीखत नोंदवितेवेळी किशोर रावळे यांनी आम्हा हिस्सेदारांचीच नाही तर उपविभागीय अधिकारी, दुय्यम निबंधक श्रेणी 1, तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, यांच्यापासून सत्य माहिती लपवून ठेवून त्यांची फसवणुक करुन खोटे खरेदीखत नोंदविले आहे. किशोर उर्फ किसन गंगाराम रावळे तसेच त्यांची पत्नी सौ. कुमोदिनी किसन रावळे व मिळकत खरेदी करणार सुरेश गंगाराम बारे या तिघांनी संगनमत करुन कट कारस्थान रचुन आमची तसेच शासन अधिकारी यांची दिशाभुल करुन फसवणुक केली असल्याने, बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिन विक्री करुन हस्तातरित केल्या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या योग्य त्या कलमांन्वये गुन्हा दाखल करुन, कठोर कारवाई करून आम्हास न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच किशोर रावळे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने व गावात त्याची दहशत असल्याने आमच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास किशोर रावळे हेच जबाबदार राहतील, असे या निवेदनात म्हटले आहे.