महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अवैध उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करा
गुहागर : चिरेखाण उत्खननाला महाराष्ट्र सरकार लवकरच परवानगी देणार आहे. मात्र बेकायदेशीररित्या कोणी उत्खनन करत असेल तर त्यावर कारवाई करा. केवळ वाळुसाठे जप्त करुन चालणार नाही. हे अवैध उत्खनन कोणी केले याचा तपास तलाठी, ग्रामसेवकांमार्फत शोधुन काढा. अन्यथा आम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करु. असा इशारा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रत्नागिरीत दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
[bsa_pro_ad_space id=1]
रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अवैधरित्या चिरेखाणी आणि वाळू उपसा सुरु आहे. असे पत्रकारांनी मंत्र्याच्या लक्षात आणून दिले. यावर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाराजी व्यक्त करत प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी यांना कारवाई का होत नाही याबाबत विचारणा केली. त्यावेळी प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी, बसणी आणि मिर्या या तीन ठिकाणी मिळून 138 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या तीन ठिकाणी वाळूचे ढिगारे केले होते. ते आम्ही जप्त केले. मात्र, तो वाळूचा उपसा कोणी केला होता, त्यांचे नाव पुढे आले नाही. याबाबत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली. अजून आरोपी का सापडले नाहीत. हे उत्खनन कोणी केले हे तेथील ग्रामसेवकांना, तलाठयांना विचारा. हे उत्खनन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. जे अधिकारी कारवाई करत नाहीत त्यांच्यावर आम्ही कारवाई करु, असा इशारा सत्तार यांनी दिला.
या दौऱ्यात मंत्री महोदयांनी शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. त्याबाबत बोलताना सत्तार म्हणाले की, कोकणात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. त्यांना शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. आवश्यक ते कागदपत्र पंचनाम्याचे वेळी संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. जेणे करुन शासनाकडून मदत मिळताना कोणी वंचित रहाणार नाही.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, उपस्थित होते.