गुहागर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्या एका गावात चक्क गावपुढाऱ्यांनी गावपॅनेल पळवून नेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी निश्चित केलेल्या उमेदवारांवरच आता मते मागण्याची पाळी आहे. येथील ५ उमेदवार ग्रामस्थांनी बिनविरोध निवडून आणले. तरी देखील सरपंच गावाचा होणार की पुढाऱ्यांचा ? अशी भिती या ग्रामस्थांना वाटू लागली आहे. गावाचा निर्णय ज्यांच्या सल्ल्याने चालतो अशा चाकरमान्यांवर देखील सध्या काय घडतयं, बिघडतयं हे दूरुन पहाण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाल्यावर या गावामध्ये एक बैठक झाली. बैठकीत प्रभागांनी उमेदवार देण्याचे निश्चित झाले. वाडीवाडीच्या सभा झाल्या. 9 ग्रामपंचायत सदस्यांची नावे देखील निश्चित झाली. खरतरं त्यातील काही उमेदवारांना अक्षरश: वाडी कार्यकत्यांनी निवडणूकीच्या बोहल्यावरच चढवले होते. उमेदवारी अर्ज भरुन झाले की, आपली निवडणूक बिनविरोध होणार म्हणून चाकरमानी खुषीत होते.
परंतू गावाने दिलेल्या उमेदवारांमध्ये आपले खुषमस्करे नाहीत. यापुढे गावाची सुत्रे आपल्या मनाप्रमाणे हलवता येणार नाहीत. हे कळल्यावर गाव पुढारी अस्वस्थ झाले. चौकडी बसली. निर्णय झाला. गावपुढाऱ्यांनी काहीजणांना हरभऱ्याच्या झाडावर चढवले. उमेदवार म्हणून तूच कसा योग्य आहेस. तुला ग्रामपंचायतीमधील काहीतरी कळते. तरीदेखील तुला उमेदवारी दिली नाही. हे योग्य नाही. तु अर्ज भर. तुला लागेल ती मदत आम्ही करतो. असे म्हटल्यावर चार उमेदवार तयार झाले. गावप्रमुख, वाडीप्रमुखांनी कुरबुर सुरु केल्यावर उमेदवारच सांगू लागला, लोकशाही आहे. कोणीही उभं राहू शकतं. तुमचा उमेदवार तुम्ही निवडून आणा. मी कुठे विरोध करतोय.
इतके होईपर्यंत गावपुढारी केवळ पडद्याआडून सुत्र हलवीत होते. चारजणांनी उमेदवारी अर्ज भरल्यावर गाव पुढाऱ्यांनी हे उमेदवार गाव पॅनेलचे असल्योची घोषणा केली. आता गावाची पंचाईत झाली. गावाने ठरवलेले उमेदवारांनी अर्ज भरले. पण पॅनेलला नावच दिले नव्हते. गावाच्या, वाडीच्या विरोधात जावून उमेदवारी अर्ज भरलेल्यांनी मात्र आम्ही गावपॅनेलचे असल्याची बतावणी केली. हे चित्र पाहिल्यावर गावाने ठरवलेल्या उमेदवारांनी हात वरती केले. तुम्ही सांगितले म्हणून अर्ज भरला. आता निवडून आणण्याची जबाबदारी तुमची. इतक्यात आणखी एक बातमी येवून धडकली. गावाने ठरवलेल्या उमेदवारांपैकी जे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्याच्यापैकी एकाने मी गावपॅनेलचा असल्याचे घोषित केले. त्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोधची भाषा करण्याची (ग्रामस्थ आणि चाकरमानी दोघांची) अवस्था सध्या तोंड दाबून गावपुढाऱ्यांचा मार अशी झाली आहे.
9 सदस्यांच्या ग्रामपंचायतीत आपला सरपंच, उपसरपंच निवडून येण्यासाठी बहुमत आवश्यक. गावाने ठरविलेले उमेदवार देखील गाव पुढाऱ्यांच्या वळचणीला गेले तर प्रस्थापितांच्या हातून गाव सोडवायचा कसा. असा प्रश्र्न आता गावप्रमुख, वाडीप्रमुख, गावासोबत असलेले अन्य कार्यकर्ते (गावपुढाऱ्यांचे विरोधक ?) यांना पडलाय. सध्या गावाने निश्चित केलेले चारही उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आहे. मतदारांसाठी 15 तारखेला निवडणूक संपेल. पण गावकरी आणि चाकरमान्यांसाठी सरपंच, उपसरपंच पदावर बसेपर्यंत गाव पुढाऱ्यांशी मुकाबला करावा लागणार आहे.