भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातूंचे मुख्यमंत्र्याना निवेदन
03.09.2020
गुहागर : कोकणातील चिरेखाण हा प्रमुख व्यवसाय असून त्याला परवानगी मिळावी. अशी मागणी उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोकणातील चिरेखाण हा प्रमुख व्यवसाय असून यामध्ये अनेक परराज्यातील व परजिल्ह्यातील कामगारांचा समावेश असतो. गणपतीनंतर कोकणातील चिरेखाण व्यावसायिक महसुलकडे अर्ज करणे, रॉयल्टी भरणे, परवाना पुस्तके घेणे, कामगारांना आणणे, त्यांची व्यवस्था करणे आदी कामांना सुरवात करतात. पाऊस कमी झाल्यावर या व्यवसायाला सुरुवात होते.
निसर्ग चक्रीवादळामुळे पडलेल्या घरांची दुरुस्ती जनतेला करायची आहे. नवीन घरे, इमारतींची बांधकामे पावसानंतर सुरु होतात. तसेच लॉकडाऊनच्या काळात अपूर्ण राहीलेली अनेक बांधकामे पूर्ण होणे बाकी आहे. या बांधकामांसाठी कोकणात सर्रास जांभा चिरा वापरला जातो. चिरेखाणींच्या उत्खननातून शासनालाही मोठ्या प्रमाणात महसुल मिळतो.
महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसायांपैकी साखर कारखाने बाहेरच्या जिल्ह्यातील कामगार येऊन सुरु होतील. परंतु कोकणातील चिरेखाण हा व्यवसाय दुर्लक्षित राहिल. तरी कोकणातील चिरेखाण हा प्रमुख व्यवसाय सुरु करण्याच्यादृष्टीने तातडीने निर्णय घ्यावा. असे निवेदन माजी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, उद्योगमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे दिले आहे.