गुहागर : धोपावे डावलवाडीतील ग्रामस्थ गंगाराम पांडुरंग भेकरे यांचे २८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.१५ वा. साई आशा हाँस्पिटल, नवी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्यामागे पत्नी, तिन मुलगे, एक मुलगी, सुन आणि नातवंडे असा परीवार आहे.
सर्वांना सोबत घेवून जाणारे आणि आपला मुद्दा स्पष्टपणे मांडणारे गंगाराम भेकरे हे ग्रामस्थांचे आवडते व्यक्तिमत्त्व होते. १९६८ मध्ये धोपावे डावलवाडीमधील मुंबई रहाणाऱ्या मंडळींनी डावळवाडी विकास मंडळाची स्थापना केली. यामध्ये गंगाराम भेकरे यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. डावळवाडी येथे प्राथमिक शाळा सुरु करण्यासाठी त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली. शासनाकडे पाठपुरावा, ग्रामस्थांबरोबर संवादातून समन्वय अशी अनेक कामे त्यांनी केली. गावाच्या विकासासाठी धोपावे ग्रामविकास मंडळ, मुंबई या मंडळाची स्थापना सन १९७५ साली झाली. गंगाराम भेकरे स्थापनेपासूनच मंडळाचे सदस्य होते. क्रियाशील कार्यकर्ता ते प्रमुख सल्लागार अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या. गावाच्या विकासासाठी मंडळाने केलेल्या अनेक कामांमध्ये तनमनधन अर्पून त्यांनी काम केले.
धोपावे ग्रामविकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी गाव आणि वाडी विकासासाठी सच्चा लढवय्या हरपला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर सरचिटणीस अनिल भुवड, खजिनदार प्रकाश डावल यांनी डावलवाडीसह धोपावे गाव ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकली अशा शब्दात गंगाराम भेकरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.