जामसूतमध्ये नूतन ग्रा.पं. इमारतीचे उद्घाटन
गुहागर : ‘एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जामसूत गावामध्ये आलो असताना काही ग्रामस्थांनी मला जवळच आणि रस्त्यालगत आमची ग्रामपंचायत असून तिथे येण्याचा आग्रह केला. त्यांच्या आग्रहास्तव तिथे पोहोचलो, परंतु ग्रामपंचायत इमारत कुठे दिसत नव्हती. मी विचारले तेव्हा ग्रामस्थांनी बोट दाखवून ‘ही आमची ग्रामपंचायत’ असे म्हटले. मी आश्चर्यचकित झालो. खोपटीपेक्षाही वाईट अवस्था असलेल्या झोपडीत ग्रामपंचायत कार्यालय होते. ग्रामस्थ मला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चला म्हणाले. पण, ‘तुमची ग्रामपंचायत नवीन बांधून देईन मगच मी कार्यालयात पाऊल ठेवेन’, असे वचन मी दिले होते. त्यानंतर त्यासाठी तात्काळ निधी मंजूर केला आणि आज त्याची वचनपूर्ती करून ग्रामपंचायतीची नवीन वास्तू लोकार्पण होत आहे, याचा मला अतिशय आनंद होत आहे, असे उद्गार आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी काढले.
गुहागर तालुक्यातील जामसूत ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या तालुक्यात अनेक कामं मंजूर झालेली आहेत. पण काही मंडळींनी ती जाणीवपूर्वक रखडवून ठेवली आहेत. कामं घ्यायची, पण ती जाणीवपूर्वक पूर्ण करायची नाहीत आणि तसे करून लोकांचे आमदारांविषयीचे मत वाईट करायचे हा त्यांचा हेतू. या ग्रामपंचायतीचे कामदेखील अशाच प्रवृत्तीच्या ठेकेदाराने घेतले होते. पण, काम सुरू करण्याऐवजी तो ते सोडायच्या मार्गावर लागला. त्यामुळे या ठेकेदाराला टर्मिनेट करून दुसरा ठेकेदार नेमणे या प्रक्रियेमध्ये वेळ गेला आणि इमारतीचे काम पूर्ण व्हायला दोन वर्ष गेली, असेही आ. श्री. जाधव यांनी योवळी स्पष्ट केले.
गावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न केले होते. पिंपर धरणातून पाणी आणून योजना राबविण्याचा आपण प्रयत्न केला. परंतु, मागच्या भाजप सरकारने एकही पाणीयोजना मंजूर केली नाही. मात्र, आता आपले सरकार आल्यानंतर आपण जलजीवन मिशन योजनेमध्ये जामसूत गावचा समावेश केलेला आहे. तुम्ही कागदपत्र तयार करून परिपूर्ण प्रस्ताव करा, तात्काळ पाणी योजना करू आणि गावाला पाणी देवू, असे सांगून विकासाची अन्य कामेदेखील मार्गी लावू असा शब्दही आ. श्री. जाधव यांनी यावेळी दिला.
सरपंच श्री. बाबू सावंत यांनी आपल्या भाषणात गावामध्ये झालेली सर्व कामे ही आ. जाधव यांच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त कोणीही विकासाची कामे करू शकणार नाही हे केवळ आम्हालाच नाही तर संपूर्ण तालुक्यातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे भविष्यात आमचा पूर्ण गाव त्यांच्याच पाठिशी खंबीरपणे राहिल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. पूर्वी निमूणकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा खेतले, उपसभापती सुनील पवार, विनायक मुळे, जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर, प्रवीण ओक, पंचायत समिती सदस्य सिताराम ठोंबरे, गावचे सरपंच संतोष उर्फ बाबू सावंत, उपसरपंच सौ. सृष्टी रेवाळे, माजी सरपंच किशोर साळवी, विश्वनाथ साळवी, निलिमा साळवी, वनिता डिंगणकर, सतीश मोरे, शैलेश साळवी, महेश जामसूतकर आदी उपस्थित होते.