२९ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू
गुहागर : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर ग्रामपंचायत निवडणूका गाव पॅनेलच्या माध्यमातून बिनविरोध करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतलेला दिसून येत आहे. आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती अनेक ग्रामपंचायत होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीत आमदार जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाने तालुक्यातील राजकीय गणिते बदलून गेली आहेत. दुसरीकडे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसची महाविकास आघाडी असली तरी गुहागरात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आघाडी होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेस सोडून अन्य सर्वच पक्ष जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
तालुक्यातील कोंडकरूळ, रानवी, भातगाव, तळवली, निगुंडळ, पालपेणे, नरवण, पिंपर, मळण, शीर, वेळणेश्वर, जामसुत, मासू, अडूर, काजुर्ली, शिवणे, गोळेवाडी, मुंढर, पडवे, काताळे, उमराठ, कुडली, पेवे, खामशेत, साखळी बुद्रुक, साखरी आगर, कोळवली, गिमवी, कोसबीवाडी आदी २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत. त्यादृष्टीने आपला जि. प. गट व पं. स. गण अधिक मजबूत करण्यासाठी विद्यमान सदस्य प्रयत्नशील आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील राजकारण बदलले आहे. आमदार जाधव यांनी सेनेत प्रवेश केला आहे. यामुळे ताकद वाढली असली तरी त्यांना अधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी जुन्या-नव्याची सांगड घालत गाव पातळीवरील राजकारण यशस्वी करावे लागणार आहे. पूर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायत सेनेच्या बनल्या आहेत. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडी एकत्र असले तरी गुहागरात मात्र राष्ट्रवादी सेनेला अडसर ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र आरेकर यांची नियुक्ती झाल्यापासून तालुक्यातील प्रत्येक गावातील वाडीवस्तीवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. गाव पातळीवरील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या एकत्रित बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यात सत्तेत असल्याने विकास कामे करण्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला जात आहे. शिवाय राष्ट्रवादी पासून लांब असलेले गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप बेंडल यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचे तालुक्यातील ताकद वाढलेली दिसत आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या माध्यमातून वाडी-वस्तीवर बैठका सुरू केल्या आहेत. भाजपचे योग्य नियोजन हेच त्यांच्या यशाचे गमक असते. केंद्रशासनाच्या योजनांच्या जोरावर अधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. खरी लढत ही सेना, राष्ट्रवादी व भाजप या तीन राष्ट्रीय पक्षांमध्ये होणार हे निश्चित आहे.