वेलदुरच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेतील प्रकार
गुहागर : गुहागर तालुक्यातील वेलदुर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखेत नेमलेल्या बँकेच्या सराफाने संगनमत करून बँकेची १४ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विदर्भ कोकण बँकेचे वेलदुर शाखेचे मॅनेजर मकरंद पत्की यांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी संजय फुणगुसकर हा बँकेत सराफाचे काम पाहत होता. त्याने मिलिंद जाधव, मनोहर घुमे, गणेश कोळथरकर, सुलोचना पावसकर, शबीया परबुलकर, विक्रांत दाभोळकर, राजेश भोसले, विनया दाभोळकर यांचे सोन्याचे खोटे दागिने खरे दाखवून तसेच ते खरे असल्याचे खोटे मूल्यांकन केले. हे खोटे दागिने खरे दागिने दाखवून बँकेकडे गहाण ठेवून वरील सर्व आरोपीनी दि. ५ जुलै २०१९ ते १७ जुलै २०२० या कालावधीत बँकेची १४ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान झाले व बँकेची फसवणूक झाली आहे. संजय फुणगुसकर याने काही सप्टेंबर महिन्यात याच बँकेतील शाखा व्यवस्थापिका सुनेत्रा दुर्गुळे यांचा पैशाच्या हव्यासापोटी खून केला होता. या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. सदरील प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.