रत्नागिरी : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे पर्यटन व्यावसायाला सुगीचे दिवस आले आहेत. दिवाळीचा मोसम समाधानकारक गेला असतानाच आता ख्रिसमस, ‘थर्टी फर्स्ट’ आणि नवीन वर्ष स्वागताकडे पर्यटन व्यावसायाचे लक्ष लागले आहे. त्यासाठी कोकणातील किनारे खुणावत असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासह खासगी हॉटेल-लॉजिंग व्यावसायिक सज्ज झाले आहेत. एमटीडीसीचे गणपतीपुळेतील निवासस्थानाच्या आरक्षणाला पर्यटकांकडून पहिली पसंती मिळत आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली आणि कुणकेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळे आणि गुहागर तालुक्यात वेळणेश्वर येथे निवास व्यवस्था आहेत. ३१ डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप आणि १ जानेवारी २०२२ रोजी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक उत्सुक झाले आहेत. यंदाही थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाभिनंदनासाठी पर्यटकांकडून महामंडळाच्या तिन्ही जिल्ह्यांमधील निवासस्थानांना प्राधान्य दिले जात आहे. यंदा २० ते २४ डिसेंबर या कालावधीत ७५ टक्के आरक्षण झाले असून २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीसाठी ९५ टक्के आरक्षण झाल्याचे एमटीडीसीच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किनारी भागात विविध उपक्रम सुरू केले आहेत. पर्यटकांसाठी गणपतीपुळे येथे बोट क्लब सुरू केले आहे. पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येतो. गणपतीपुळे दर्शन सहल हा नवा उपक्रम सुरू केला असून त्यासाठी बॅटरी ऑपरेटेड कार आहे. काही दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथे योगा बाय द बीच या उपक्रमाची सुरवात केली आहे. आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यातील महामंडळाच्या रिसोर्टमध्ये वास्तव्य करणार्या पर्यटकांना याचा लाभ घेता येणार आहे.
गणपतीपुळेतील एमटीडीसीबरोबरच लॉजिंगला मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातून निवास व्यवस्थेचे ख्रिसमससाठी आरक्षण सुरू आहेत. त्यामुळे डिसेंबरच्या अखेरीस गणपतीपुळेत प्रचंड गर्दी होईल अशी शक्यता आहे. याच कालावधीत एसटी सुरू झाल्या तर ही सुविधा सामान्य वर्गातील पर्यटकांच्या पथ्थ्यावर पडणार आहे. रेल्वेने रत्नागिरीत आलेल्या पर्यटकांना खासगी वाहतुकीचा भुर्दंड बसतो. सध्या शनिवारी, रविवारी बर्यापैकी पर्यटक दाखल होत असल्यामुळे व्यावसायिकांमध्ये समाधानकारक वातावरण आहे.