NDRF च्या दोन तुकड्या कोल्हापूरला रवाना
कोल्हापूर : कोल्हापूरात पुराची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. कोल्हापूरात पावसाचा हाहाकार सुरूच आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढल्याने कोल्हापूरात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारपासून कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यात आता पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची चित्रे पहायला मिळत आहेत. पंचगंगा नदीची पातळी ३६ फुटांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ७७ बंधारे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे कोल्हापूरला महापूराचा धोका निर्माण झाला असून आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी NDRF च्या दोन तुकड्या पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. कोल्हापूरात पुराची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.
NDFR च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८ वाजता पुण्याहून NDRF च्या दोन तुकड्या कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. कोल्हापूरची सद्य परिस्थिती पाहता महापूर येण्याची दाट शक्यता असल्याने १ जून ते १५ ऑगस्ट पर्यंत NDRFचे पथक कोल्हापूरात तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार आज पथके कोल्हापूरात तैनात करण्यात आली असून एक पथक कोल्हापूरात तर महापूराचा धोका वाढल्यास दुसरे पथक शिरोळ तालुक्यात तैनात करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
कोल्हापूरात गेल्या दोन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे राधानगरी, काळम्मावाडी, चांदोली धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. तर पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी गुरुवारी सकाळी ३५ फुटांपर्यंत आली होती. पंचगंगेची धोक्यांची पातळी ३९ फूट आहे. त्यामुळे कोल्हापूरात पावसाचा कहर असाच सुरु राहिला तर संध्याकाळपर्यंत पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.