दोन हजार माशांचे पालना सोबत कलिंगड, केळी, शेवगा आणि पपईची लागवड
गुहागर, ता. 04 : गेली 10 वर्ष केवळ शेतीवर उदरनिर्वाह करुन समाधानी असलेला शेतकरी पाटपन्हाळे (ता. गुहागर) येथे आहे. भातशेतीला भाजीपाल्याची जोड देत या शेतकऱ्यांने शेतीला सुरवात केली. आज २ एकरात कलिंगड, १० गुंठ्यात पपई, १० गुंठ्यात शेवगा, २० गुंठ्यात तीन प्रकारच्या केळीची प्रत्येकी ५० झाडे आणि पावटा शिवाय शेततळ्यात मत्सशेती असा शेती उद्योग हा शेतकरी करत आहे. उत्पादित कृषीमालाला स्थानिक बाजारपेठतच ग्राहक आणि वितरणासाठी स्थानिक महिलांची शृंखला या शेतकऱ्याने तयार केली आहे.
ही यशोगाथा आहे पाटपन्हाळेतील तुकाराम तेलगडे यांची. 10 वर्षांपूर्वी ते आपल्या जमीनीत भातशेती करत होते. भातशेतीला भाजीपाल्याची जोड देवून त्यांनी कृषी उत्पन्न वाढवले. याचवेळी कृषी खात्याचे अधिकारी तुकाराम तेलगडेंना भेटले आणि मेहनत केली तर कलिंगड शेतीतून चांगला फायदा मिळेल. आम्ही शेतावर येवून मार्गदर्शन करू. शासनाच्या योजना सांगू. असे सांगितले. त्यामुळे तुकाराम तेलगडेंनी 8 वर्षांपूर्वी भाजीपाल्यासोबत कलिंगड लागवड केली. त्यामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त फायदा झाला. कृषी विभागातील अधिकाऱ्यांसोबत त्यांचे मित्रत्त्वाचे संबंध बनले. कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्याजवळ शेततळ्याची कल्पना मांडली. पावसाचे पाणी साठवले तर अधिक काहीतरी करता येईल म्हणून तेलगडेंनी शेततळ्याचा प्रस्ताव पाठवला. सहा वर्षांपूर्वी प्रत्येक तालुक्यात शेतीसाठी मेहनत घेणाऱ्या, प्रयोगशील, सातत्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्याला एक शेततळे १०० टक्के अनुदानावर देण्याची योजना कोकण कृषी विद्यापीठाने आणली होती. तालुक्यातून आलेल्या प्रस्तावातून लॉटरीपध्दतीने एका शेतकऱ्याची निवड करायची होती. तुकाराम तेलगडेंना दैवाची साथ मिळाली. शेततळ्याची लॉटरी त्यांना लागली. सुमारे 4.50 लाखाचे अनुदानातून 70 फूट लांब, 70 फूट रुंद आणि 9 फूट खोल असे शेततळे त्यांनी बांधले. या पाण्याचा उपयोग करुन कलिंगड लागवडीचे क्षेत्र त्यांनी २ एकरापर्यंत वाढवले. भाजीपाला लागवड केली. फळबाग लावली. येणारा शेतीमाल स्थानिक महिला तालुक्यात विक्रीला नेवू लागल्या. त्यातून वितरणाची शृंखला तयार झाली. स्थानिक बाजारपेठ तयार झाली. केवळ पारंपरिक पध्दतीच्या शेतीवर अवलंबून न रहाता प्रत्येक हंगामात पीक मिळेल अशी लागवड केल्याने तुकाराम तेलगडेंची शेती नुकसानीत गेली नाही. आज त्यांचा मुलगा तेजस तेलगडे देखील बीकॉमची पदवी घेतल्यानंतर नोकरी न करता शेती करु लागला आहे.
गेल्यावर्षी कोल्हापुरातील एक हॉटेल व्यावसायिकांने तुकाराम तेलगडेंकडे मत्स्यशेतीचा असा प्रस्ताव ठेवला. मत्स्यशेतीसाठी आवश्यक शेततळे असणे ही मोठी उपलब्धी होती. त्यामुळे तुकाराम तेलगडेंनी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेवून शेततळ्यात मत्स्यशेती करणे निश्चित केले. कोकण कृषी विद्यापीठाकडून प्रशिक्षणाची माहिती घेतली. बारामतीला जावून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर कोल्हापूरातून पँगेसीयस (Pangasius) नावाच्या नव्या प्रजातीची 2000 मत्स्यबीजे आणून त्यांनी जुलै महिन्यात तळ्यात सोडली आहेत. माशांची वाढ होण्यासाठी दररोज सकाळी व सायंकाळी प्रत्येकी २ किलो मत्स्यखाद्य टाकावे लागते. त्यासाठी दररोज 240 रुपये खर्च होतात. पाचव्या आणि सहाव्या महिन्यात मत्स्यखाद्याचे प्रमाण वाढवावे लागते. असे तुकाराम तेलगडेंनी सांगितले. सहा महिन्यांनी म्हणजे जानेवारी महिन्यात पूर्ण वाढ झालेला 1 ते 1. 250 किलोचा माशांचे उत्पादन त्यांना मिळणार आहे. हा मासा 100 ते 120 रु. प्रतिकिलो या दराने विकला जाणार आहे. हे मासे विकत घेण्यासाठी कोल्हापूर, रत्नागिरी मधील काही हॉटेल व्यावसायिक, मत्स्य व्यावसायिक त्यांच्याजवळ बोलणी करत आहेत.
मत्स्यशेतीसाठी शेततळे वापरताना माशांची विष्ठा आणि तळाशी साठणारी अन्य घाण बाहेर काढता यावी म्हणून शेततळ्याच्या तळाला फनेलचा आकार देवून त्यामध्ये १ एच.पी.चा सबमर्सिबल पंप बसविण्यात आला आहे. दर चार दिवसांनी या पंपाने तळाशी साठणारी घाण काढून टाकली जाते. तसेच वाऱ्याने तळ्यात तरंगणारा कचरा वाहून जाण्याची व्यवस्थाही तुकाराम तेलगडे यांनी केली आहे. या पाण्याचा वापर ते शेतीसाठी करतात.
भाजीपाला, फळबाग यांचे योग्य व्यवस्थापन केले तर शेतीतून फायदा होतो. मे महिन्यात भातशेतीच्या कामामुळे उत्पन्नाचे साधन म्हणून मत्स्यशेतीकडे वळलो. हा पहिलाच प्रयोग आहे. यातूनही तोटा नक्की होणार नाही अशी आजची स्थिती आहे.
तुकाराम तेलगडे, पाटपन्हाळे