आजपासून सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत रहाणार खुली
मुंबई : राज्य सरकारने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताच तसेच मुंबईचा गेल्या दोन आठवड्यातील संसर्ग दर खूपच कमी झाल्यामुळे अखेर मुंबईतील दुकाने आणि आस्थापना आज, मंगळवारपासून आठवड्याचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, हॉटेल 4 वाजेपर्यंतच उघडी राहणार आहेत.
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काल उशीराने मुंबई शहरासाठी व उपनगरांसाठी नवे आदेश जारी केले. औषधाची दुकाने २४ तास खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु हॉटेल्स मात्र दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. जलतरण तलाव आणि निकट संपर्क येऊ शकतो असे क्रीडा प्रकार वगळून अन्य इनडोअर व आऊटडोअर खेळांस आठवडयाचे सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी दिली गेली आहे. चित्रपट मासिकांचे चित्रीकरण नियमीत वेळेनुसार करण्यास परवानगी आहे.
मुंबईचा गेल्या दोन आठवडय़ांतील संसर्ग दर (पॉझिटिव्हटी रेट) १.७६ टक्के, तर प्राणवायू खाटांच्या व्याप्तीचा सरासरी दर १८.९७ टक्के इतका खाली आल्याने महापालिका आयुक्तांनी हे निर्णय जाहिर केलेत.